आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिकामी तिजोरी, घोषणा भारी ; सत्ताधा-यांना विरोधक घेरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या मागील वर्षीच्या अंदाजपत्रकातील जेमतेम 1300 कोटी रुपयांच्या कामांची अंमलबजावणी झाली असताना व यंदा एलबीटीमुळे उत्पन्न घटले असतानाही स्थायी समितीकडून तब्बल 2900 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महासभेवर सादर केले जाणार आहे. त्यात महासभेकडून जवळपास पाचशे कोटींची वाढ होण्याची शक्यता असून, एकूणच ‘रिकामी तिजोरी, घोषणा भारी’ या मुद्यावरून सत्ताधाºयांना विरोधकांकडून घेरले जाणार आहे.

विशेष महासभेत शनिवारी (दि. 5) स्थायी समिती सभापती राहुल ढिकले हे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. गेल्या वर्षी 1800 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्तांनी मंजूर केले होते. त्यात स्थायी व महासभेने वाढ केल्यावर 2800 कोटींपर्यंत आकडा गेला. यंदा तर एलबीटीमुळे पालिकेची स्थिती नाजूक असल्यामुळे जमेची बाजू सत्ताधारी कसे सांभाळतात हे बघणे कसोटीच ठरेल.
फेरफारावरून माजी आयुक्त अडचणीत : अंदाजपत्रकात जुनी आकडेवारी बदलता येत नाही; मात्र त्यात फेरफार करण्याचा गंभीर प्रकार तत्कालीन आयुक्त संजय खंदारे व लेखापरीक्षक राजुरकर यांनी केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते धनंजय तरटे यांनी केला आहे. सातपूरमधील आनंदवली येथे घरकुल योजनेचे काम झालेले नसताना अंदाजपत्रकात मात्र सन 2010-11 तसेच 2011-12 मध्ये 10 कोटींचा खर्च त्यासाठी दाखवला गेला. त्यावर तरटे यांनी आक्षेप घेतल्यानंतर स्थायीकडून मंजूर अंदाजपत्रकात आयुक्तांकडून फेरफार झाले. तत्कालीन अधिकाºयांनी हा प्रकार केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी तरटे यांनी केली आहे.

कसरत आणि कसोटी
आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीकडून एक हजार 90 कोटींची वाढ झाली. मात्र, ही वाढ करताना जमेची बाजू दाखवण्याची कसरत करावी लागेल. उदाहरणादखल जाहिरात करापोटी दोन कोटीचे उत्पन्न आयुक्तांनी गृहीत धरले. मात्र, येथे 98 कोटींची वाढ करण्यात आली असून, तार्किकदृष्ट्या वाढीचे स्पष्टीकरण मिळालेले नाही. दुसरीकडे नगरसेवकांना एक कोटीपर्यंतचा निधी देण्याची कसरत असून, स्थायी समिती सदस्यांना गतवेळी एक कोटी निधी असताना यंदा पाच कोटी विकासनिधी देण्याचेही प्रस्तावित आहे.