आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला प्रशिक्षणाचा सात कोटींचा ठेका वादात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना सात कोटी रुपयांचा महिला प्रशिक्षणासाठीचा ठेका विशिष्ट संस्थेला देण्याची प्रक्रिया वादात सापडली असून, त्याविरोधात नगरसेवक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. या निविदा प्रक्रियेतील नियमांनाही मूठमाती दिल्याने प्रशासनाच्या कारभाराविरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिला व बालकल्याण विभागाने 19 प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियोजन केले होते. त्यासाठी आयुक्तांनी अंदाजपत्रकात दोन कोटींची तरतूद केली होती. मात्र, स्थायी समितीने त्यात पाच कोटींची वाढ केली. प्रशिक्षणाच्या ठेक्यासाठी विभागनिहाय निविदा काढण्यात आल्या. त्यात पूर्व विभागात केवळ दोन ठेकेदारांनी तयारी दर्शवली. नियमाप्रमाणे तीन निविदा प्राप्त न झाल्यास पुनर्प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र, त्यास फाटा देत एका विशिष्ट ठेकेदाराला हा ठेका दिल्याचे समजल्याने नगरसेवकांनी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

माजी महापौरांनी दिले होते पत्र : यापूर्वी माजी महापौर बाळासाहेब सानप यांनी पत्र देऊन महिला प्रशिक्षणाचे कंत्राट विभागनिहाय देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात विशिष्ट संस्थेला ठेका देण्याच्या प्रक्रियेने नगरसेवकांचा संशय बळावला आहे.

विभागनिहाय ठेका हवा
- प्रशिक्षणासाठी विभागनिहाय ठेका देण्याची गरज असून, निविदेतील शर्थींचा भंग झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पुनर्निविदा करून इ-टेंडरिंग प्रक्रियेने प्रशिक्षणासाठी ठेकेदार निश्चित करावा. कविता कर्डक, गटनेत्या, राष्ट्रावादी कॉँग्रेस