आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशीही बनवाबनवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गंगापूर धरणातील पाण्याच्या साठय़ाविषयी पाटबंधारे व महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सत्यस्थिती दडवून ठेवत असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे पाणीटंचाई निर्माण झाल्यास पर्याय म्हणून शहर परिसरातील खासगी विहिरी निश्चित केल्याचे अधिकार्‍यांनी स्थायी समितीच्या सभेत स्पष्ट केले. याचाच अर्थ, पावसाचे आगमन लांबल्यास नाशिककरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
पाटबंधारे विभागाने गंगापूर धरणातून जादाचे आवर्तन सोडल्याने निर्माण झालेल्या पाणी कपातीचे पडसाद शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. वेळेत पाऊस न पडल्यास येणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने काही खासगी विहिरी निश्चित करून त्या अधिग्रहित करण्याची तयारी सुरू केली असून, आवश्यकता पडल्यास या विहिरीतून शहरास पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सभेत सांगितले.

धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी कपातीचे संकट आल्याचे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत स्पष्ट झाले होते. त्यावर शनिवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करत सभापती उद्धव निमसे यांनी टंचाई निर्माण झाल्यास कोणकोणत्या उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत, याबाबतचा जाब अधिकार्‍यांना विचारला. त्यावर पाणीपुरवठा अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी शहरातील काही खासगी विहिरींची निश्चिती केल्याचे सांगितले. तसेच, पाणी उचलण्यासाठी अकराशे हातपंप उपलब्ध करण्यात आले असून, आवश्यकता वाटल्यास बोअरवेलही घेतले जातील, असे पुढे नमूद केले.
अंदाजपत्रकासाठी विशेष सभा - सभेत सभापतींच्या आदेशानुसार अंदाजपत्रक सादर करून त्याचे वाचन करण्यात आले. सन 2012-13 साठी 1170.85 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत करावयाच्या विविध कामांसाठी स्वतंत्र तरतूदही याच अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. मागील वर्षी मिळालेले 77 कोटींचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासंदर्भात सभापती निमसे यांनी सांगितले, की अंदाजपत्रक केवळ सादर केले असून, त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे.
विहिरींची यादीच नाही - टंचाई काळात अधिगृहित करण्यात येणार्‍या विहिरींची यादी केल्याचे स्थायी समितीमध्ये सांगितले असले तरी यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना या ठिकाणांची माहितीच नसल्याचे विचारणा करता निदर्शनास आले. विशेष म्हणजे, विहिरींची संख्याही कोणाला सांगता आली नाही.
हे विषय ठेवले तहकूब - महापालिका हद्दीतील बाजार फी दरवाढ करण्याबाबतचा विषय तहकूब ठेवण्यात आला. त्याचप्रमाणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सभेत सादर करण्यात आलेले सर्व म्हणजे 18 विषयही तहकूब करण्यात आले.