आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Corporation's Tankar Wasting 1 Crore Litter Water

नाशिक महापालिकेचे टँकर सांडतात एक कोटी लिटर पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तसे पाहिले तर आज जागतिक जलसंरक्षण दिन. पाणी कसे जपले पाहिजे आणि कसे जपले जात आहे, याचीच चर्चा यानिमित्ताने झाली पाहिजे. पण, एक एक व्यक्ती जिवापाड जे पाणी वाचवते, ते टॅँकरद्वारे एकाच दिवसात कसे वाया जाते? त्याची आज चर्चा. त्यामुळे पाण्याची नासाडी थांबली, तर जलसंरक्षणाच्या दिशेने ते एक मोठेच पाऊल ठरेल. पाणीकपातीनंतरही महापालिकेला थेंब न् थेंब कसा वाचवावा, याविषयी जाग आलेली नाही. सरकारी खर्चात फुकटचे पाणी देणार्‍या पालिकेच्या टँकरमधून दीड मिनिटाला 15 लिटर अशी गळती होत असून टँकरद्वारे प्रत्येक मिनिटाला दहा लिटर पाणी रस्त्यावर सांडतेय. पालिकेच्या पाच टँकरच्या महिनाभरातील सरासरी तीनशे फेर्‍या आणि व्यस्त वाहतुकीतून मार्गक्रमणासाठी किमान एक तासाचा कालावधी गृहित धरला तर, जवळपास एक कोटी लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा अंदाज डी. बी. स्टारच्या अभ्यासातून पुढे आला आहे.


गळती सोडाच; फेर्‍यांचा लागेना हिशेब
टॅँकरद्वारे पाणी वितरणाची जबाबदारी असलेले कार्यकारी अभियंता यू. एम. धर्माधिकारी यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यामुळे शहरात पाणीपुरवठा करणार्‍या टॅँकरमधून होणार्‍या गळतीचा सोडाच; फेर्‍यांचाही हिशेब लावणे अवघड झाले. धर्माधिकारी यांच्या माहितीप्रमाणे पाच टँकरने महिन्यात सरासरी तीनशे फेर्‍या केल्या आहेत. मात्र, एकट्या जीपीओ जलकुंभाजवळील टॅँकर रजिस्टरमध्ये फेब्रुवारीत 282 फेर्‍या झाल्याची नोंद आहे. महापालिकेचे सहा विभाग असून प्रत्येक विभागात टॅँकर भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. जीपीओ जलकुंभावर तीन विभाग अवलंबून असून या विभागासाठीच महिन्याला 282 फेर्‍या होत असतील, तर अन्य विभागातील टँकर फेर्‍यांची सरासरी व त्यातून होणार्‍या गळतीचा हिशेब काय? तो पालिकेकडेही नाही. डी. बी. स्टारने विचारणा केल्यानंतर पाणीपुरवठा विभाग खडबडून जागा झाला; मात्र टँकरच्या फेर्‍या व गळतीचा हिशेब लावण्यात प्रचंड अडचणी येत गेल्या. सरासरी फेर्‍या किती होतात, याचाही ताळमेळ लागत नव्हता. साधारण एका टँकरच्या मागणीप्रमाणे फार तर दिवसातून चार खेपा होतात, असे धर्माधिकारी यांनी सांगितले. त्याचा हिशेब केला तर, महिनाभरात 600 फेर्‍या होत्या. सुट्या वगळून 500 फेर्‍या गृहित धरता येतील. थोडक्यात, फेर्‍यांचा मेळच लागत नसल्यामुळे गळतीचा आकडा नेमका किती हे ठरवणे अवघड होते.

खासगी टॅँकरमधून गळती व अनारोग्य
खासगी टॅँकरमधूनही मोठय़ा प्रमाणात गळती होते. शहरात अत्यंत जुनाट व गंजलेल्या खासगी टॅँकरची संख्या बरीच मोठी आहे. या टॅँकरचे व्हॉल्व्ह खराब असल्यामुळे पाणी गळती तर होतेच, शिवाय ज्या स्त्रोतातून पाणी भरले जाते त्याचीही नियमित तपासणी होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. मुळात हे पाणी पिण्याव्यतिरिक्त वापरण्याची मुभा असतानाही धार्मिक सोहळे, लग्नकार्य व अन्य प्रयोजनात पिण्यासाठी वापरले जात असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात खासगी टँकरचा वापर वाढला तर, दूषित पाणी प्यायल्यामुळे साथरोग पसरत असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे.
वाचेल 75 हजार लोकांचे पाणी

टँकरमधील थेंबा-थेंबातून होणार्‍या महिनाभरातील गळतीचा विचार केला तर, दहा हजार लोकांचे एका दिवसाचे पाणी वाचू शकते. प्रतिमाणशी प्रतिदिवस पाणी वापर 130 लिटर गृहित धरण्यात आला आहे. त्यानुसार 100 लाख लिटर पाण्यात 75 हजार लोकांचे एका दिवसाचे पाणी वाचू शकते.
तरच वापरा टँकर

कपातीचा कालावधी वगळून महापालिकेने पाणीपुरवठा बंद ठेवला अथवा वाहिनीत बिघाड होऊन पाणीपुरवठा ठप्प झाला, तर टँकरद्वारे पाणी मागणे योग्य ठरेल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. पवार यांनी सांगितले. मुळात महापालिकादेखील तशीच परिस्थिती असल्याचे पाहूनच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करते.
अशीही ‘सेफ साइड’

महापालिकेतील पदाधिकारी, अधिकार्‍यांच्या नावाखाली काही नगरसेवकांकडून सातत्याने टँकरची मागणी केली जाते. प्रत्येकवेळी टँकर देताना वरिष्ठांचे आदेश आहेत की नाही याची खातरजमा त्यांच्याशी चर्चा करून करता येत नाही. त्यामुळे जलकुंभाजवळ एक नोंदवही ठेवण्यात आली असून, दूरध्वनी करणार्‍या नगरसेवक व अधिकार्‍याची रीतसर नोंद त्यात ठेवली जाते. टंचाईच्या काळात विशिष्ट भागात जादा टँकर कसे गेले अशी विचारणा झालीच, तर ‘सेफ साइड’ म्हणून अधिकार्‍यांना बचाव करण्यासाठी ही नोंद फायदेशीर ठरू शकते. याचे उदाहरण घ्यायचे ठरले तर, नवी मुंबईत आसारामबापू यांच्या भक्तांना रंगपंचमी खेळण्यासाठी पालिकेतील एका अभियंत्याच्या सूचनेप्रमाणे टँकर पुरवले गेले होते. ही बाब नोंदवहीतून लक्षात आल्यानंतर तातडीने संबंधित अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करून त्याला निलंबित करण्यात आले.

14,86,000लोकसंख्या
330 द.ल. लिटर नाशिकचा पाणीवापर
11 द.ल.घ.फू. कपातीनंतरचे पाणी
135 लिटर प्रतिमाणशी पाणी वापर
14 द.ल.घ.फू. पाणीवापर

दीड मिनिटात 15 लिटर..
बी. डी. भालेकर शाळेजवळील पालिकेच्या जलकुंभाजवळ ‘दिव्य मराठी’ चमूला पाणी भरण्यासाठी उभा असलेला एक टँकर दिसला. टाकीतून आलेल्या हायड्रंटद्वारे पाणी भरले जात होते. पाणी भरताना खालच्या भागातील कॉकजवळील व्हॉल्व्हमधून गळती सुरू होती. जवळपास 12 ते 15 धारा विविध भागातून उडत होत्या. एक धार एक लिटरच्या बाटलीत पकडली. दीड मिनिटात एक लिटर बाटली सहज भरली. आता अशा किमान दहा जलधारांचा विचार केला तरी, दीड मिनिटात किमान 15 लिटर पाणी वाया गेले असा निष्कर्ष काढता येईल.
.तर महिनाभरात किती?

महापालिकेकडे पाच टॅँकर आहेत. एक टँकर महिनाभरात किमान तीनशे फेर्‍या करतो. वाहतूक कोंडी लक्षात घेतली तर, टँकरला एक फेरी पूर्ण करण्यासाठी किमान 50 ते 60 मिनिटांचा कालावधी लागतोच. दीड मिनिटात 15 लिटर पाण्याची नासाडी गृहित धरली, तर 30 मिनिटांत 300 लिटर आणि 60 मिनिटांत 600 लिटर पाण्याची नासाडी होते. आम्ही ज्या टँकरच्या पाणी गळतीचा अभ्यास केला, त्या टँकरने फेब्रुवारीत 282 फेर्‍या मारल्या. या टँकरची साठवणूक क्षमता आठ हजार लिटर आहे. दीड मिनिटात 15 लिटर याप्रमाणे गळती आणि एक तासाचा वाहतूक कालावधी लक्षात घेत 282 फेर्‍यांत जवळपास 17 लाख लिटर पाण्याची नासाडी झाल्याचे स्पष्ट होते. हीच सरासरी गृहित धरून पाच टँकरचा विचार केला तर, जवळपास 85 लाख लिटर पाण्याचा अपव्यय होतो असे दिसते. पाणी वितरित करीत असताना, तसेच टँकरवरील उघड्या झाकणातून होणारी गळती बघितली तर महिन्याकाठी सुमारे एक कोटी लिटर पाण्याचा अपव्यय होतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
हायड्रंटमधून बारा तासात 1340 लिटरची गळती

महापालिकेच्या बहुतांश जलकुंभाजवळील हायड्रंटमधून गळती सुरू असून टॅँकरमध्ये पाणी भरल्यानंतरही गळती सुरूच राहाते. बी. डी. भालेकर शाळेजवळ टँकर भरून गेल्यानंतरही हायड्रंटमधून गळती सुरूच होती. एक लिटरची बाटली लावल्यानंतर अध्र्या मिनिटातच पूर्ण भरली. जवळपास एक तास हायड्रंटमधून असेच पाणी सुरू होते. या पाण्याचा हिशेब केला, तर 120 लिटर पाणी वाया गेले. हायडंट्र दिवसभर असाच वाहत असतो. दिवसातील बारा तासांचा विचार केला तर, 1340 लिटर पाण्याची नासाडी होते.

याकडे ठेवावे नगरसेवकांनी लक्ष
*टॅँकरद्वारे पाणी पुरवण्याची खरोखरच गरज आहे की नाही याची खातरजमा करा.
*धार्मिक कार्य, लग्नसोहळे यासाठी पाणी देताना उधळपट्टी थांबवा.
*शक्यतो महापालिकेचा पाणीपुरवठा बंद असेल, तेव्हाच टँकरची मागणी करा.
*उद्यान, क्रीडा स्पर्धा, बांधकामासाठी टँकर मागणीचा आग्रह टाळावा.
थेट प्रश्न
आर. के. पवार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग
*पाणी पुरवणार्‍या टॅँकरची दुरुस्ती होते का?
साधारणपणे आठ टँकर पालिकेसाठी पाणी पुरवत असून तीन-चार महिन्यातून एकदा दुरुस्ती होते.

*गळती थांबवण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काय?
व्हॉल्व्हमध्ये ठरावीक कालावधीनंतर बिघाड होत असतो. अद्याप कायमस्वरूपी तोडगा सापडलेला नाही; मात्र उद्याच सर्व टँकरची दुरुस्ती करून घेतो.
*एक एक थेंब पाणी वाचवण्याची गरज वाटते का?
टंचाईचा काळ असल्यामुळे पाणीगळती कमी कशी होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. बिघाड झालेल्या सर्वच यंत्रणांची दुरुस्ती करून घेणार आहे.

शुद्धिकरणाची जबाबदारी ग्राहकाची
टॅँकरमधील पाणी विहिरीतून घेतलेले असल्यामुळे शुद्धीकरण महत्त्वाचे ठरते. ही जबाबदारी ग्राहकांची असून आम्ही पाणी दिल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला औषधे टाकून जलशुद्धीकरण करावे असे सांगत असतो. पाणी वाया जाते हे नाकारून चालणार नाही. रोहित शिंदे, टॅँकरचालक

भविष्यात रेकॉर्ड मेन्टेन करू
उपअभियंत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे टँकरच्या फेर्‍या सांगितल्या. नेमक्या किती फेर्‍या झाल्या, याची माहिती गोळा केली जाईल. भविष्यात रेकॉर्ड मेन्टेन केले जाईल. यू. एम. धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता
इर्मजन्सी कॉक बसवावे

धरणाला ज्याप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व्हिस गेटपाठोपाठ इर्मजन्सी गेट लावले जातात, त्याच धर्तीवर टॅँकरमधून बाहेर पाणी सोडण्यासाठी बसवलेल्या पाइपवर डबल कॉक लावावे. जेणेकरून, पुढचा कॉक खराब झाला तर मागील कॉक पाणी बाहेर येऊ देणार नाही. डॉ. संजय दहासहस्त्र, जलतज्ज्ञ