आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपोवन परिसरात फिरणार्‍या प्रेमी युगुलाची बंदूक रोखून लूट; मोबाइल, कॅमेरा लांबविला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तपोवन परिसरात फिरणार्‍या प्रेमी युगुलाला दोन जणांनी बंदुकीचा धाक दाखवत व हवेत गोळीबार करत लूटमार केली. या युगुलाकडील मोबाइल आणि कॅमेरा या लुटारूंनी लांबवला. ही घटना शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. लूटमार करणार्‍या दोघा संशयितांना पकडण्यासाठी पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे. संशयितांकडील मोबाइल लोकेशनच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. गोळीबाराच्या या प्रकाराने तपोवन परिसरात घबराट पसरली आहे.

नाशिकरोड येथील एका शाळेत मानधनावर शिक्षिका असलेली तरुणी व महावीर तंत्रनिकेतन महाविद्यालयातील एक तरुण शनिवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान दुचाकीने तपोवन परिसरात फिरण्यासाठी आले होते. राम, सीता व लक्ष्मण यांच्या शिल्पाजवळ ते एका झाडाखाली बसले असताना, दोघांनी तेथे येऊन पैशांची मागणी केली. तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर एकाने एअरगन काढून डोक्याजवळ लावून धमकावले. त्यात झटापट होऊन गोळीबार झाल्याने मोठा आवाज आला.

संशयितांनी तरुणाचा मोबाइल आणि कॅमेरा घेऊन पळ काढला. काही वेळातच पंचवटी पोलिस ठाण्याचे गस्ती पथक फायरच्या आवाजाच्या दिशेने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत लुटारू फरार झाले. पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील, संदीप दिवाण, सहायक आयुक्त गणेश शिंदे, पंकज डहाणे, बाजीराव भोसले, सुभाष डौले, रमेश पाटील यांनी तत्काळ दाखल होत तपासाची सूत्रे फिरवली. भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरी लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोबाइल टॉवरच्या आधारे काठेगल्ली येथे लोकेशन मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात नाकेबंदी
या घटनेची खबर मिळताच विविध पोलिस ठाण्यांतील अधिकार्‍यांसह कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या तिन्ही युनिटचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन शहराच्या विविध भागात नाकेबंदी केली. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचे छायाचित्र घटनेतील युगुलास दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्नही सुरू होता.