आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या भीतीने पळणार्‍याचा बुडून मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - पोलिसांच्या भीतीने पळणार्‍या प्रल्हाद सूर्यकांत खेडकर (26, मारुती मंदिरामागे, दसक) या तरुणाचा दसक येथे गोदापात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. त्याच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

दसक गावाच्या मागील बाजूला असलेल्या मावलाई मळ्यात सहा ते सात तरुण पत्ते खेळत होते. त्याच वेळी उपनगर पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच येथे बसलेल्या तरुणांनी पळ काढला. त्यांच्यातील प्रल्हाद आणि गब्या कुमावत हे दोघेही नदीपात्राकडे पळाले. त्यातील कुमावत हा तरुण नदीकडेला असलेल्या खडकाच्या कपारीत लपला. तर, प्रल्हाद पोहत पोहत नदीपात्रात गेला. मात्र, तेथे जाऊन तो बुडाला. तो बुडाल्याचे समजताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. उशिरापर्यंत शोधूनही त्यांना मृतदेह सापडला नाही. बुधवारी सकाळी मृतदेह दलाच्या हाती आला. बुडणार्‍यास वाचवण्याऐवजी पळ काढणार्‍या आणि दगड मारणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी गावकर्‍यांनी केली.

पोलिसांना घेराव
नदीतून मृतदेह काढल्यानंतर घटनास्थळी आलेल्या आडगाव पोलिसांना गावकर्‍यांनी घेराव घालून जबाबदार पोलिसांवर कारवाईची मागणी केली. गोंधळलेल्या पोलिसांनी वरिष्ठांना व उपनगर पोलिसांना माहिती देऊन गावकर्‍यांची समजूत काढल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

कारवाईसाठी तगादा : दसक नदीपात्रालगत जुगार अड्डय़ावर काही जण पत्ते खेळत असल्याचे फोन उपनगर पोलिसांना आले. बंदोबस्तामुळे तत्काळ कारवाई झाली नाही, त्यामुळे कंट्रोल रुमला फोन केल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी पोलिसांना बघून जुगार खेळणार्‍यांनी पळ काढल्याची माहिती निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.

पोलिस जबाबदार
पोलिसांची गाडी बघून पत्ते खेळणार्‍यांनी भीतीपोटी नदीपात्राच्या बाजूला पळ काढला. पात्रात उतरलेल्या तरुणांवर पोलिसांनी काठावरून दगडफेक केल्यामुळे प्रल्हाद बुडाला. पोलिस फक्त पाहत होते. नंतर त्यांनी पळ काढला, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. घटनेस जबाबदार पोलिसांवर कारवाईची मागणी मयताचे वडील सूर्यकांत महादू खेडकर यांनी उपनगर पोलिसांकडे केली.