आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमालकासह तिघांचा दिंडोरीत खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी (जि. नाशिक) - ग्राहक व हॉटेल कर्मचार्‍यांत क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीचे पर्यावसान हॉटेलमालकासह तिघांच्या खूनात झाले. ही थरारक घटना नाशिक-पेठ मार्गावरील हॉटेल आरती येथे बुधवारी रात्री घडली. सुमारे दोनशेच्या जमावाने या हॉटेलवर हल्ला चढवून हे हत्याकांड घडवून आणले. रमेश दगू सोनवणे (30 हॉटेल मालक), कामगार मनोज ऊर्फ मनोहर राजाराम पाटील (39 रा. अहिमपूर ता . रावेर जि जळगाव) याच्यासह ग्राहक श्रीराम पांडू शेखरे (39 गोळशी) यांचा मृतांत समावेश आहे.

नाशिक पेठ धरमपूर रस्त्यावर गोळशी फाट्याजवळ आरती बिअर बार आहे. बुधवारी रात्री किरण संपत ढाकणे, श्रीराम पांडू शेखरे आणि रमेश वामन गायकवाड हे मद्यपान करण्यासाठी तेथे गेले होते. या वेळी त्यांच्यापैकी एकाने टेबलवर ओकारी केली. या प्रकारामुळे हॉटेल मालक सोनवणे यांनी त्यांना दमदाटी केली, परिणामी सोनवणे व या तिघांत बाचाबाची झाली. वाद वाढत गेल्याने हॉटेल कर्मचार्‍यांनी तीनही मद्यपिंना बेदम मारहाण करत हॉटेल बाहेर काढले. ढाकणे व गायकवाड जखमी अवस्थेत रात्री घरी पोहोचले. मात्र, शेखरे घरी न आल्याने गुरुवारी सकाळी कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह एका झुडपात आढळून आला.

ही बातमी वार्‍यासारखी परसताच परिसरातील सुमारे 200 संतप्त नागरिकांचा जमावाने लाठय़ा-काठय़ा, गज, कुर्‍हाडीने हॉटेलवर हल्ला करत तोडफोड केली. तसेच हॉटेल मालक सोनवणे व कामगार पाटील यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर बाकीचे कामगार जिवाच्या आकांताने पळाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी हॉटेलमध्ये येऊन पाहणी करून पंचनामा केला.