आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधाराच्या साम्राज्यात भुरट्या चोरांचा उच्छाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - उपनगर भागातील कॉलनी व सोसायट्यांमधील रहिवासी भुरट्या चोर्‍यांमुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. रात्री अंधाराचा फायदा घेत होणार्‍या या चोर्‍यांमध्ये किंमत कमी असली तरीही महत्त्वाच्या असलेल्या वस्तू चोरीस जात आहेत. त्यामुळे या प्रकरणांची तक्रार होत नसल्याने, पोलिसांच्या दप्तरी मात्र भुरटे चोरटे बेदखल आहेत.

इच्छामणी मंदिर परिसर, शिक्षक कॉलनी, गोदावरी सोसायटी, मयूर सोसायटी, हनुमंतनगर, ब्रrागिरी सोसायटीतील रहिवाशांच्या घराबाहेरील हौदावर असलेली झाकणे, नळाच्या तोट्या, कपडे, भांडी, नळाचे पाइप, कुंपणाचे लोखंडी खांब इत्यादी महत्त्वाच्या वस्तू चोरट्यांचे लक्ष्य बनल्या आहेत.

वाहनचालकांची लूटमार
उपनगर ते इंगळेनगर (कॅनॉलरोड) रस्त्यावरील पथदीप बंद व त्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट यामुळे धिम्या गतीने चालणार्‍या वाहनचालकांच्या लुटीचे प्रकार घडत आहेत. वाहनांना अडवून धमकावत चालकाच्या खिशातील पैसे व चीजवस्तू हिसकावून घेतल्या जातात. या घटनांमुळे अनेकांनी रस्ताच बदलला आहे. यापूर्वी झालेल्या मोठय़ा लुटमारीच्या घटनांचा अद्याप तपास लागलेला नाही. रस्त्यावरील झोपडपट्टीत कित्येक भंगाराची दुकाने असून, पोलिस व त्यांची वाहने तेथे बिनधास्त थांबलेले असतात. या सर्व प्रकारांमागील सूत्रधार पोलिसांना माहीत असतानाही, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे.

झोपड्यांचे अतिक्रमण
कॅनॉलरोड, 40 फुटी रस्त्यावर झोपड्या उभ्या राहिल्याने हा रस्ता 10 ते 12 फुटाने कमी झाला आहे. त्याकडेही पालिकेची डोळेझाक होत असल्याने झोपड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांची वाहने रात्री रस्त्यावर उभी राहत असल्याने, अपघातांची शक्यताही वाढली आहे. रस्त्यावरील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या त्रासामुळे एसटीने येथे बसफेर्‍या कमी केल्या आहेत.

तक्रारीअभावी कारवाई नाही
कॅनॉलरोडवरील झोपड्यांबाबत परिसरातील नागरिकांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यास कारवाई करण्यात येईल. के. एस. कारवाल, पथकप्रमुख, अतिक्रमण विभाग

गस्त वाढवणार
परिसरातील संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे. अंधाराचा फायदा घेत होत असलेल्या भुरट्या चोर्‍यांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन गस्त वाढविण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. डी. एस. स्वामी, सहायक पोलिस आयुक्त