आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Currency Press Best Unit Performance Award

नाशिक नोट प्रेसला ‘बेस्ट युनिट परफॉर्मन्स’ पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - केंद्रीय अर्थमंत्रालयांतर्गत असलेल्या प्रेस महामंडळाच्या सहाव्या वर्धापनदिन समारंभात रविवारी नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला महामंडळाचा देशातील सर्वोच्च ‘बेस्ट युनिट परफॉर्मन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री नमोनारायण मिणा यांच्या हस्ते महाप्रबंधक टी. आर. गौडा यांनी दोन्ही प्रेसमधील हजारो कामगारांच्या साक्षीने मानाच्या सीएमडी चषकाचा स्वीकार केला. यामुळे नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. देशातील हैदराबाद, मुंबई, कोलकाता, नोएडा, नाशिक, देवास व होशंगाबाद येथील चार टांकसाळ, दोन करन्सी मुद्रणालय, दोन सिक्युरिटी प्रेस व एक कागद कारखान्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने 2008 मध्ये भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (एसपीएमसीआयएल) या महामंडळात रूपांतर केले. या पाच वर्षांत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी व करन्सी नोट प्रेसमधील कामगारांनी उत्पादन व नफ्यात केलेल्या वाढीचा गौरव होतच होता. त्यात भरीस भर करन्सीला हा सर्वोच्च मानाचा सन्मान मिळाला. वर्धापनदिन सोहळ्यात 2011-12 या वर्षात देशातील नऊ युनिट व उत्कृष्ट कामकाज करणार्‍या कामगारांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :

बेस्ट युनिट परफॉर्मन्स (सीएमडी कप) -करन्सी नोट प्रेस (नाशिक).

सर्वाधिक उत्पादन : करन्सी नोट प्रेस (नाशिक).

ऊर्जा संवर्धन : बीएमपी, देवास.

पर्यावरण : इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक.

प्रशिक्षण व विकास : होशंगाबाद.

सुरक्षितता : देवास.

अधिकारी, कामगार पुरस्कार : लक्ष्मीकांत दास, असिम कुमार पांडेय, सॅमसुयल हुके (सर्व आयजीएम, कोलकाता), शारदा मदन गोपाल, ए. वाय. म्हात्रे, एम. बी. राऊत (सर्व आयजीएम, मुंबई), मोहम्मद ताहीर, के. विजेंद्र राव (सर्व आयजीएम, हैदराबाद), सत्यकुमार, भूपाल सिंग (आयजीएम, नोएडा), जी. व्ही. सोमसेकर, बी. चंद्रशेखर (सर्व एसपीपी, हैदराबाद), ए. एल. बामलिया, एम. एस. लोहार, तन्मय तेलंग (सर्व एसपीएम, होशंगाबाद), आर. के. पटेल, कोमल सिंग बेस (सर्व बीएनपी, देवास), साहेबराव चौधरी, शांताराम किसन खेलूकर, मधुकर लक्ष्मण बोराडे (सर्व इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक), एस. एस. राजपुरोहित, आर. बी. पगारे, एस. एन. माळी (सर्व करन्सी नोट प्रेस, नाशिक), प्राची भाटिया, मोहम्मद अर्शद (सर्व कॉर्पोरेट ऑफिस), व्हिजिलेन्स अँवॉर्ड : एस. पी. गेडाम (आयजीएम, एसपीपी, हैदराबाद).

हिंदी अवॉर्ड : जयर्शी साठे (करन्सी नोट प्रेस, नाशिक). देशातील नऊ युनिट अंतर्गत नाशिक येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेतील पुरस्काराचे कार्यक्रमात वितरण झाले. स्पर्धेचे अजिंक्यपद डीएनपी, देवास संघाने पटकाविले; तर करन्सी नोट प्रेस संघ उपविजेता ठरला.

सर्वोत्कृष्ट फलंदाज : सचिन दिवटे (नाशिक)

सर्वोत्कृष्ट गोलंदाज : एस. एस. गायकवाड (नाशिक)

मॅन ऑफ दि सिरिज : आशिष दत्ता (देवास).

नाशिक व देवास प्रेससाठी 400 कोटी मंजूर

करन्सी नोट प्रेस (नाशिक) व बीएनपी (देवास) प्रेसच्या आधुनिकीकरणासाठी प्रत्येकी दोनशे याप्रमाणे 400 कोटी रुपयांच्या दोन बँक नोट प्रिंटिंग लाईन मशीन बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 800 मिलियन नग मुद्रण क्षमतेत वाढीबरोबरच अत्याधुनिक सुरक्षिततेचा वापर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.