आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik D.Ed College Probalem And Student Agitation

विद्यार्थिनींनी शिकवला यंत्रणेस ‘धडा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रणरागिणीचे रूप धारण केलेल्या डी. एड. विद्यार्थिनींनी शासकीय कन्या विद्यालयातून अध्यापिका विद्यालयाचे स्थलांतर करण्याचा डाव मंगळवारी हाणून पाडत संवेदनाहीन सरकारी यंत्रणेला चांगलाच धडा शिकवला. शिक्षणाधिकार्‍यांपासून पोलिस अधिकार्‍यांपर्यंत सर्वांनाच त्यांनी धारेवर धरले. दीड महिन्यापासून वर्गात पोहचणे मुश्कील झालेले असताना शिक्षणमंत्री, पालकमंत्र्यांनाही हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नसल्याबद्दल त्यांनी धिक्कार केला. तब्बल चार तासाहून अधिक काळ आंदोलनाच्या आघाडीवर झुंजणार्‍या चार विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्याने त्यांच्या मैत्रिणींचा संताप अनावर झाला.

शासकीय कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वर्ग रिकामे करण्यासाठी लावत असलेल्या तगाद्यामुळे अखेर विद्यार्थिनींचा संयम सुटला व सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी कन्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती चौधरी यांना घेराव घालून जाब विचारण्यास सुरुवात केली. ‘इमारत जिल्हा परिषदेच्या मालकीची असून जि. प. सर्वसाधारण सभेच्या ठरावाप्रमाणे अध्यापिका विद्यालय स्थलांतरित करून पूर्ण इमारत कन्या शाळेसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे. दोन कोटींच्या निधीतून नूतनीकरण सुरू आहे,’ असे त्यांनी सांगताच विद्यार्थिनींनी ‘एनसीआरटीई’ची परवानगी नसताना परस्पर अध्यापिका विद्यालयाचे काम बंद करण्याचे अधिकार दिले कोणी, असा सवाल करीत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विद्यार्थिनींचा संयम सुटत असल्याचे पाहून तातडीने सरकारवाडा पोलिस व नाशिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी यांना पाचारण करण्यात आले.

अनुत्तीर्ण झाल्यास जबाबदार कोण?

दीड महिन्यापासून विद्यार्थिनींची हेळसांड केली जात असून पुढील महिन्यातील परीक्षा कशी द्यायची, अनुत्तीर्ण झालो, तर शैक्षणिक नुकसान जि. प. शिक्षणाधिकारी भरून देणार काय? असा सवाल विद्यार्थिनींनी परदेशी यांना केला.

शासकीय कन्या शाळेत कुलूपबंद अध्यापन !

शासकीय कन्या शाळेत याआधी पाचवी ते दहावीचे वर्ग भरत होत;े मात्र यंदापासून पहिली ते चौथीचेही वर्ग सुरू केले आहेत. सकाळी भरणार्‍या वर्गांसाठी अध्यापिका विद्यालयाचे दहा वर्ग ताब्यात घेण्यात आले. पहिली ते चौथीचे वर्ग भरल्यानंतर खोल्यांना कुलूप लावले जाते व त्यानंतर पाचवी ते दहावीचे विद्यार्थी आल्यावर त्यांना घुसवून पुन्हा वर्ग बंद केले जातात, अशा तक्रारी विद्यार्थिनींनी केल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले.

शुक्रवारच्या बैठकीत ठरेल भवितव्य

शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी लेखी पत्र देऊन 2 ऑगस्टला सर्व यंत्रणाप्रमुखांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यात म्हटले आहे की, 2 ऑगस्टला जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. बैठकीतील निर्णय सर्वांनाच बंधनकारक असेल, असेही मोगल यांनी स्पष्ट केले.

प्रयोगशाळा अन् संगणक कक्ष बंद

अध्यापिका विद्यालयातील प्रयोगशाळा व संगणक कक्षही बंद केल्यामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली. शासकीय यंत्रणा एका सरकारी विद्यालयाची कोंडी करीत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

राज्यपाल दौरा राहू द्या; आधी मोगलांना आणा..

गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ‘राज्यपालांचा दौरा असल्याने त्यानंतर 3 ऑगस्टला बैठक घेऊन तोडगा काढू,’ असे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त विद्यार्थिनींनी राज्यपालांच्या दौर्‍याचे कारण न सांगता शिक्षणाधिकार्‍यांना हजर करा, असे सांगत घोषणाबाजी सुरू केली. परस्पर वर्ग खोल्या बंद करणार्‍या मोगलांना निलंबित करा, अशा घोषणा त्या देत होत्या.

पोलिस बळाने चिरडले आंदोलन

जवळपास 79 विद्यार्थिनी आंदोलन करीत असताना त्यांना समजावण्यासाठी वा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रारंभी महिला पोलिस अधिकारीच नव्हे तर कर्मचारीही नव्हत्या. आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर पोलिसी बळाचा वापर करून विद्यार्थिनींना ताब्यात घेण्यात आले.