आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Dam Pollution Issue Police Action On Track Driver

धरणामध्ये कचरा टाकणार्‍यास दंड; ट्रकचालकावर तातडीने कारवाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गंगापूर धरणक्षेत्राच्या परिसरात कचरा टाकण्याचा प्रयत्न दक्ष नागरिकांनी हाणून पाडल्याच्या ‘दिव्य मराठी’तील वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागापाठोपाठ तालुका पोलिस ठाण्यानेही कारवाई केली. ट्रकचालक शांताराम रामचंद्र कापसेला अटक करून न्यायालयात हजर केले असता 3100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

नाशिकच्या 17 लाख नागरिकांसह अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणक्षेत्राची सुरक्षितता धोक्यात आली आहे. उन्हाळ्यात जगभरातून येथे विविध जातीचे पक्षी धरणाजवळच्या भागात येतात. मात्र, परिसरातील माती मोठय़ा प्रमाणात उचलली जाऊन ठिकठिकाणी खड्डे पडत असल्यामुळे पक्ष्यांचे प्रमाणही कमी होत आहे. या परिसरात मद्यपी, प्रेमी युगुलांचा वावर दिवसेंदिवस वाढत असतानाच बांधकाम साहित्याचा कचरा टाकून नागरिकांच्या जिवाशी खेळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला. कचरा टाकणार्‍या ट्रकचालकास जागरूक नागरिकांनी वेळीच थांबवून त्याचे प्रबोधन करत कचरा उचलण्यास प्रवृत्त केले. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप निकम यांनी ट्रकच्या क्रमांकावरून (एमडब्लूएन 1073) ट्रकमालकाचा शोध घेतला. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून धोका निर्माण केल्याचा, तसेच मुंबई पोलिस अधिनियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालक कापसे (रा. गोवर्धन) यास अटक करून हजर केले असता न्यायालयाने 3100 रुपयांचा दंड ठोठावला.

पाटबंधारे विभागाची सुरक्षा यंत्रणा कुठे?
गंगापूर धरणक्षेत्राच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी पाटबंधारे विभागाची असून, या विभागाने पाच सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीसह सहा-सात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. त्याचे नियंत्रण पाटबंधारे अधिकार्‍यांकडेच असून, त्यांनी या प्रकारानंतर पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती. पोलिस अशा प्रकरणी स्वत:हून कारवाई करतील. दिलीप निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक