आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यातील देवळ्यात राष्ट्रवादीला खिंडार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळा: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील मोठा गट भारतीय जनता पक्षात गेल्याने तालुक्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे. त्याचे दूरगामी परिणाम तालुक्याच्या राजकारणात होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
देवळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गण आहेत. देवळा, उमराणा गट राखीव झाल्याने एकमेव लोहोणेर या सर्वसाधारण गटाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. या गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने राष्ट्रवादीच्या एका गटाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला खिंडार पाडले आहे. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत देवळा तालुक्यात माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर व माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांच्या गटातच चुरशीच्या लढती होत असे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वसंतदादा साखर कारखान्याच्या राजकारणात आहेरद्वयी एकत्र आले असून, युवा नेतृत्वही देवळा बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आहेत. देवळा बाजार समितीचे सभापती आणि राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे सभापती केदा आहेर यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात पुन्हा एकदा द्वयींमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच चांदवड-देवळ्याचे आमदार शिरीष कोतवाल व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार, तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ए. टी. पवार यांनीही देवळा तालुक्यात लक्ष केंद्रित केल्याने त्यांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
देवळा गट हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून राष्ट्रवादीकडून लोहोणेरच्या सदस्या उषाताई बच्छाव, आमदार ए. टी. पवारांचे पुत्र प्रवीण पवार येथून इच्छुक आहेत. तर कॉँग्रेसकडून देवळ्याचे बापू जाधव यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. भाजपकडून माजी सरपंच प्रकाश गांगुर्डे यांचे नाव चर्चेत आहे. उमराणा गटात सध्यातरी शांतता आहे. लोहोणेर गटातून केदा आहेर व पंडितराव निकम आमने-सामने उभे राहात असून, त्यांच्या समोर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख यांनीही आव्हान दिले आहे. त्याचबरोबर नुकत्याच कॉँग्रेसमध्ये गेलेल्या लक्ष्मीबाई शेवाळे यांनी लोहोणेर गटातून उमेदवारी मागितल्याने येथे चौरंगी लढत अटळ आहे.
गणांचे आरक्षण पाहता खरी लढत देवळा दहिवड, उमराणे, लोहोणेर गणात होणार असून, देवळा गणातून राष्ट्रवादीकडून लीना आहेर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर कॉँग्रेसकडून उपसरपंच सुलभा आहेर, वैशाली मेधणे या इच्छुक आहेत. भाजपकडून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या भारती आहेर, दीप्ती आहेर, पूनम आहेर यांची नावे चर्चेत आहेत. तर दहिवड गणातून राष्ट्रवादीकडून पिंपळगावचे माजी सरपंच केवळ वाघ, दहिवडचे माजी सरपंच डॉ. राजेंद्र ब्राह्मणकर यांनी उमेदवारी मागितली आहे. तर कॉँग्रेसकडून देवळ्याचे माजी सरपंच जितेंद्र आहेर, दिलीप पाटील यांना उमेदवारी हवी आहे. भाजपकडून केदा शिरसाठ यांची उमेदवारी निश्चित होत आहे.
लोहोणेर व उमरगा गणात समोरचा पक्ष कोणाला उमेदवारी देतो; यावर उमेदवारी देण्याची योजना रचली जात आहे. वाखारी व महालपाटणे या राखीव गणात सर्वच पक्षांना उमेदवार आयात करावे लागणार आहेत. देवळा तालुक्यात पुन्हा आहेर विरुद्ध आहेर असा सामना रंगतो की, तडजोडीचे राजकारण होते हे येत्या काही दिवसात कळेलच.