आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Devlali Cilender Blast Accused Police Custody

सिलिंडर स्फोटप्रकरणी एकाला पोलिस कोठडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - देवळाली गावातील गवळीवाडा येथील अवैध गोदामात गॅस सिलिंडर स्फोटप्रकरणी अटक केलेल्या मनोज ऊर्फ बट्टू नायर याला न्यायालयाने 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अनिल माधव नायर हा संशयित जखमी असून रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नसून नायरचा सहकारी जयेश मकवाना अद्याप फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील आरोपी नायरच्या घराच्या झडतीत पोलिसांना दोन गॅस एजन्सीची 12 कार्ड मिळाली. जखमी अनिल नायर व जयेश मकवाना यांची झडती व चौकशीत अद्याप काही ग्राहकांचे कार्ड व एजन्सीची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.पोलिसांनी एजन्सीच्या संचालकांची व गॅस वितरित करणा-या कर्मचा-यांची चौकशी केली. एका व्यक्तीकडे 12 कार्ड कसे व ज्यांचे कार्ड आहेत त्यांना सिलिंडर मिळाले किंवा नाही याची नोंद करण्यात येते का? येत असेल तर ती कशी पुरवठा अधिका-यांना पत्र देऊन याबाबत विचारणा करण्यात येणार आहे. पुरवठा विभागाचे एजन्सीवर नियंत्रण कसे आहे, याची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच अवैधरीत्या व्यवसायासाठी सिलिंडर घेणा-या गोड व्यवसायिकांची माहिती घेऊन त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
असा सुरू होता व्यवसाय
देवळाली गावात गवळीवाडा झोपडपट्टीत अवैधरीत्या सुरू असलेला व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. इतर ग्राहकांच्या कार्डवर नाशिकरोडच्या दोन एजन्सीकडून घरगुती वापराचे सिलिंडर विकत घेऊन त्यातील गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये टाकला जात असे व ते सिलिंडर व्यवसायिक दराने विक्री केले जात होते. घरगुती सिलिंडर 410 रुपयांना घेऊन ते 1370 रुपये व्यावसायिक दराने विक्री करून मोठा नफा नायर-मकवाना कमवत होता.