आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या हंबरड्यापुढे बिबट्याही हतबल; जबड्यात धरलेल्या वैभवला सोडून केले पलायन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडांगळी (नाशिक) - पुतणी ‘वाघ, वाघ’ म्हणून किंचाळू लागली तेव्हा आईने मागे वळून पाहिले, तर बिबट्याच्या जबड्यात मुलाची मान होती. क्षणाचाही विलंब न करता जीवाच्या आकांताने ती मदतीसाठी ओरडू लागली. जवळच्या दोन महिलांनीही आरडाओरड सुरू केली. वस्तीवरचे नागरिकही लगेचच मदतीला धावले. प्रचंड आरडाओरडीने बिबट्याने तोंडात धरलेल्या चारवर्षीय चिमुरड्याला सोडून पलायन केले. सारे काही अवघ्या दोन ते तीन मिनिटांत घडले.

सोमठाणे येथील गिते वस्तीवर अनिता नवनाथ गिते या मीराबाई अडसरे, हिराबाई चव्हाणके, सुमन मोरे, पुतणी प्रियंका गिते यांच्यासमवेत मक्याच्या शेतात कणसे काढण्याचे काम करत होत्या. सायंकाळी सहाच्या सुमारास पुतणी प्रियंकाजवळ वैभव नवनाथ गिते हा चार वर्षांचा चिमुरडा खेळत होता. बिबट्याने अलगद येऊन त्याची मान जबड्यात धरली. प्रियंकाने वाघ..वाघ.. असे अोरडण्यास सुरुवात केली. वैभवची आई अनिताने मागे वळून पाहिले असता काळजाचा ठोका चुकवणारे चित्र दिसले. त्यांनी जोरजोराने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. अन्य महिलाही ओरडल्याने जवळच वस्तीवरील दीपक कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधूही मक्याच्या शेताकडे मदतीला धावले. प्रचंड आरडाओरड झाल्याने बिबट्याने वैभवला सोडून जवळच्या शेतात पलायन केले.

दीपक कोकाटे इतरांनी त्यास तातडीने वडांगळी येथील डॉ. अडसरे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले. डॉ. अडसरे यांनी त्यास नाशिकला हलविण्यास सांिगतले. वैभववर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यात वैभवच्या मानेवर, कानाजवळ मोठी जखम झाली आहे.

नाना, मला वाघाने धरले
वैभवच्या वडिलांचा हृदयाच्या आजाराने महिनाभरापूर्वीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी महिन्याचा कार्यक्रम झाला. वैभव वडिलांना नाना नावाने हाक मारत होता. वडांगळी येथे दवाखान्यात उपचार सुरू असताना वैभव शुद्धीवर आला. ‘नाना, मला वाघाने धरले’ असे तो वारंवार म्हणत होता. त्यामुळे आई अनितासह सर्वांच्याच डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या.
बातम्या आणखी आहेत...