आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेकडून जाेरदार ‘कमबॅक’ ! चार नगरपालिकांवर निर्विवाद वर्चस्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक जिल्ह्यातील सहापैकी चार नगरपालिकांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत शिवसेनेने जोरदार कमबॅक केले असताना, सर्वतोपरी जोर लावून देखील भाजपला मात्र अपेक्षित यश लाभलेले नाही. केंद्र आणि राज्यातील सत्तेपेक्षाही स्थानिक पातळीवरचे संघटन अधिक परिणामकारक ठरल्याचे हे लक्षण आहे. राष्ट्रवादीला तर चारीमुंड्या चीत व्हावे लागले आणि काँग्रेसची देखील पीछेहाट झाली. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने हे निकाल अत्यंत कळीचे ठरु शकतात. जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी लढत होती ती येवल्यातली. गेल्या दशकभरापासून येवला तसेच लगतच्या मनमाड आणि नांदगाव परिसरावर एकछत्री अंमल गाजवणारे छगन भुजबळ सध्या कारागृहात असताना त्यांचे शिलेदार कितपत टिकाव धरतात, त्याबाबत उत्सुकता होती. नेहमीप्रमाणेच भुजबळ गट आपणच कसे विजयाचे दावेदार आहोत त्याचे समीकरण आक्रमकपणे मांडत होता. प्रत्यक्षात मात्र येवलेकरांनी युतीच्या बंडू क्षीरसागर यांच्या पारड्यात मतांचे दान टाकले. अर्थात, सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे आला असला तरी युतीचे एकंदर संख्याबळ पाहता तेथे कारभार करताना फार काही मोठा संघर्ष उद््भवण्याची शक्यता दिसत नाही.
नांदगाव आणि मनमाडमध्ये मात्र भाजपला पक्षाला खातेही उघडता आले नाही. उलट या दोन्ही ठिकाणी शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखले. मनमाडमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीच्या ताब्यातून या पालिका हिसकावून घेतल्या. परिणामी, आता या संपूर्ण टापूवरचे राष्ट्रवादीचे, खरे तर भुजबळ आणि कंपनीचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. सटाण्यातसुद्धा राष्ट्रवादीला असेच हात चोळत बसावे लागले असून, तेथे स्थानिक समीकरणांमध्ये शहर विकास आघाडीच्या सुनील मोरे यांनी बाजी मारली आहे. मोरे हे पूर्वाश्रमीचे भुजबळांच्या समता परिषदेचे आहेत, हे विशेष.
सिन्नर आणि भगूरमध्ये शिवसेनेने एकहाती बाजी मारत भाजपसह सर्व प्रतिस्पर्ध्यांची जिरवली. सिन्नरमध्ये तर भाजपच्या कोकाटे यांनी प्रचारासाठी थेट मुख्यमंत्र्यांना आणून प्रतिष्ठा पणाला लावली होती. सिन्नरची कामे मार्गी लावण्यासाठी प्रसंगी आपण आपली कोरी लेटरहेड कोकाटेंकडे देऊ, असे विधान करून मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक भाजपसाठी किती महत्त्वाची आहे त्याचा प्रत्यय दिला. पण, आमदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्त्यांच्या फळीने नेकीने किल्ला लढविला आणि कोकाटे गटाच्या कपाळी पुन्हा पराभवाचा शिक्का बसला. तर भगूरमध्ये शिवसेनेने भाजपसह सर्वच विरोधकांचा पार सुपडा साफ करून टाकला. या निकालांवर सर्वाधिक परिणाम त्या त्या ठिकाणच्या स्थानिक मुद्यांनी घडविला हे तर खरेच. पण, त्यातून एकूणात जिल्हावासीयांच्या मानसिकतेचा अंदाज येण्यास नक्कीच मदत होणार आहे. भाजप नेतृत्वाने जिल्हावासीयांच्या रास्त मागण्यांकडे गेल्या दोन वर्षांत सातत्याने केलेली डोळेझाक शिवसेनेच्या बऱ्याच अंशी पथ्यावर पडली, असे म्हणावे लागेल.
गेल्या उन्हाळातील पाणीटंचाईच्या काळात आपले पाणी पळविले गेल्याची जी सार्वत्रिक भावना स्थानिकांमध्ये पसरली, त्याला भाजपच्या नेतेमंडळींची कार्यपद्धती जबाबदार आहे. तेव्हापासून भाजपविषयीच्या नकारात्मकतेत वाढ व्हायला सुरुवात झाली असून, नंतरच्या काळात उद्योजकांच्या वीजदरातील तफावत असो, बाजार समिती नियमनमुक्ती असो की, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींचा पक्षातला भरणा असो, भाजप नेतृत्वाने जनमानसाची दखल घ्यायची तसदी घेतल्याचे दिसले नाही. त्याचाच परिपाक शिवसेनेला सहानुभूती मिळण्यात झाला.
अभिजित कुलकर्णी, डेप्युटी एडिटर (नाशिक)
बातम्या आणखी आहेत...