आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा - कडवाच्या आवर्तनाने पूर्वभागास ‘जीवन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडांगळी - अत्यल्प पावसाअभावी चिंतेत असलेल्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना कडवा कालव्याचे आवर्तन सोडल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी सायंकाळी कडवा कालव्यास 150 क्यूसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले असून, त्यातून पिण्याच्या पाण्याची चिंता मिटावी, यासाठी कालव्यालगतच्या गावांमधील बंधारे भरण्यात येणार आहेत.

पूर्व भागात पुरेसा पाऊस नसल्याने जलस्रोत कोरडेठाक आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून, अनेक गावांमध्ये टॅँकर सुरू असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह वडांगळी परिसरातील शेतक-यांच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बाफणा यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर अवघ्या दोनच दिवसात कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यात आले. सोमवारी सायंकाळी कडवा धरणात आमदार कोकाटे यांच्या हस्ते जलपूजन करून आवर्तन सोडण्यात आले.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, वडांगळी येथील ग्रीन व्हिजन सोसायटीचे अध्यक्ष सुदेश खुळे, कडवा संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीश कोकाटे, शाखा अभियंता सी. एच. धूम आदींसह वडांगळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

धरणात रोज 2000 क्यूसेक संचय
धरणाची क्षमता 1869 दशलक्ष घनफूट असून, पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने दररोज 2000 क्यूसेक पाण्याचा संचय होत आहे. त्यातून दारणा धरणात 2400 क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. सध्या धरण 92 टक्के भरले असून, ओव्हरफ्लोचे पाणी 300 क्यूसेक क्षमतेने कालव्यास सोडता येणार आहे. मात्र, कालव्याची गळती विचारात घेऊन प्रारंभी 150 क्यूसेक क्षमतेने आवर्तन सोडण्यात आले आहे. पाण्याचा ओघ सुरू असेपर्यंत आवर्तनात अडचण येणार नाही. मात्र, 86 टक्क्याच्या खाली पाणीसाठा गेल्यास आवर्तन सोडण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. जास्तीत जास्त बंधारे भरून घेत पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आमदार कोकाटे यांनी दिली.

असा लाभ
पूर्व भागात समाधानकारक पाऊस नसल्याने जलस्रोत कोरडे असून, पाण्याची टंचाई असल्याने ओव्हरफ्लोच्या आवर्तनास विशेष महत्त्व आहे. 10 ते 12 दिवसांत टेलला पाणी पोहोचल्यानंतर बंधारे भरण्यास प्रारंभ होणार आहे. 150 क्यूसेक क्षमतेने सोडण्यात आलेले पाणी गळतीचा अंदाज घेऊन 200 क्यूसेकने सोडण्यात येणार आहे. त्यातून हिवरगाव, घंगाळवाडी, कोमलवाडी, वडांगळी, कीर्तांगळी, खडांगळी, मेंढी, पंचाळे, धनगरवाडी, शिंदेवाडी, निमगाव, उजनी, पुतळेवाडी आदी गावांतील सुमारे 30 बंधारे आवर्तनाच्या पाण्याने भरण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील स्थानिक पाणी योजनांना बळ मिळणार असून, जवळपास 25 ते 30 टॅँकर बंद होण्यास मदत होईल. लांबलेल्या पेरण्या नुकत्याच सुरू झाल्याने आवर्तनाचा शेतीसाठी प्रत्यक्ष फायदा होणार नसला तरी कालव्यालगतच्या गावांतील विहिरींना पाणी उतरल्यास त्याचा शेतीसाठी फायदा होईल.

अजब न्याय
कडवा धरणामुळे नाशिक, निफाड व सिन्नर तालुक्यातील शेती सिंचनाखाली येते. शिवाय या धरणातील पाण्यावर कायदेशीररीत्या इगतपुरीसह वरील तीन तालुक्यांतील जनतेचा हक्क आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील जनता पाण्यासाठी दाहीदिशा भटकत असताना त्यांचे हक्काचे पाणी दोन हजार ते 2400 क्यूसेक क्षमतेने कोणत्याही परवानगीविना पाटबंधारे विभागाचे अधिकारी दारणा धरणात सोडत आहेत. मात्र, सिन्नर तालुक्यातील तहानलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी मागणी केलेले आवर्तन सोडण्यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी लागते. ही बाब आमदार कोकाटे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कालव्यास आवर्तन सोडण्यात आले.

गळतीची समस्या कायम
गत वर्षी रब्बीच्या आवर्तनावेळी गळती झाल्याने आवर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सोडलेल्या पाण्यापैकी 2 टक्के पाणी टोकाच्या गावापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर गळतीचा प्रश्न उपस्थित झाला. या गळतीबाबत ‘दिव्य मराठी’ने वारंवार वृत्त प्रकाशित केले. मात्र, कालवा दुरुस्तीस शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात तो प्राप्त न झाल्याने गळतीची समस्या कायम आहे. त्यामुळे पाणीटंचाई असणा-या गावांना आवर्तनाचा कितपत लाभ होणार, हा प्रश्न कायम आहे.
गावनिहाय नियोजनाची गरज
सात ते आठ दिवसांत कालव्याचे पाणी टेलच्या पुतळेवाडी गावापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कडवाचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन आवर्तनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन झाल्यास कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच गावांतील बंधारे भरून घेऊन त्यांना लाभ मिळेल. योग्य वितरण झाल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही, तसेच वादाचे प्रसंगही टाळता येतील. सतीश कोकाटे, अध्यक्ष, कडवा कालवा संघर्ष समिती

डोंगळेधारकांवर कारवाई
धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कडवा धरणात पुरेसा साठा झाला आहे आणि सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने ओव्हरफ्लोच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. नियमित आवर्तन नसल्याने याचा शेती पिकांसाठी वापर करता येणार नाही, केवळ बंधारे भरून घेण्यात येतील. शेतक-यांनी डोंगळे त्वरित काढून घ्यावीत, अन्यथा पाटबंधारे विभागाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल.
सी. एच. धूम, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग