आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ उत्सवास दणक्यात प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रसिकांनी तुडुंब भरलेलं दादासाहेब गायकवाड सभागृह, खिळवून ठेवणारा अभिनय आणि फुसकुलीपासून ते खळखळाटापर्यंत हास्य पसरवणार्‍या ‘आधी बसू, मग बोलू’ नाटकाने ‘दिव्य मराठी’च्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त ‘दिव्य मराठी उत्सव’ दणक्यात सुरू झाला.

नवरा-बायकोने एकमेकांवर लादलेलं अपेक्षांचं ओझं, त्याचं तर्क करणं-तिचं शंका घेणं, त्यातून होणारी चिडचिड, आपलं भांडण दुसराच कोणीतरी येऊन सोडवणार अशी खात्रीच बाळगत, एकमेकांच्या भावनांचा चुराडा करत ओढाताणीचा कसा संसार होतो, हे विनोदी पद्धतीने सांगताना ‘आधी बसू.’ने रसिकांना पोट धरून हसवले. संजय नार्वेकर रंगमंचावर येताच रसिकांनी जल्लोष अन् टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. शेजारी राहणार्‍या अजय काळेचे (संजय नार्वेकर) उदाहरण देत आपल्या पतीला, पाटीलला (वैभव सातपुते) तसेच वागायला लावणारी पत्नी स्मिता (वैशाली साळवी), शिक्षक काळे आणि एमआर असलेल्या पाटीलचे एकत्र मद्यपान यातून वैतागलेली काळेची पत्नी अनघा (योगिनी चौक) यांच्यात वाढत चाललेला वाद, एकमेकांचं हिरावून घेतलेलं स्वातंत्र्य आणि घेतलेली टोकाची भूमिका यावर तोडगा काढण्यासाठी आलेलं विशाखा (तेजस गाढवे) आणि विनायक (अक्षय शिंपी) हे भूतकाळ विसरायला सांगणारं गद्रे दांपत्य स्वत:च वाद घालतात. अशा आशयाचं हे नाटक. वाद घालण्यापेक्षा एकत्र बसून चर्चेने मार्ग काढला तर प्रत्येकाला आनंदी जगता येईल हेच सांगतं. नाटकाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी उत्तम केले होते. गीते गुरू ठाकूर, तर संगीत अवधूत गुप्तेचे होते.

प्रारंभी ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड मदनसिंग परदेशी, निवासी संपादक जयप्रकाश पवार, सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीज्च्या संचालिका रार्जशी राजेगावकर, अनिल जैन, वैशाली जैन आणि संजय नार्वेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या उत्सवाला प्रारंभ झाला. ‘दिव्य मराठी’चे ब्युरो चीफ अभिजित कुलकर्णी यांनी ‘दिव्य मराठी’च्या दोन वर्षांतील कारकीर्दीचा आढावा घेतला. वैशाली जैन यांनीही मनोगत व्यक्त केले.