आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमटले अद्भुत भावविश्व: पंडित संजीव अभ्यंकरांच्या गायनाने रसिक भारावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- व्याकूळ विरहिणीची आर्तता तितक्याच उत्कट सुरांमधून व्यक्त करीत अस्वस्थ, पण हव्याहव्याशा संवेदना जागविणारे तरल भावविश्व निर्माण करून रसिकांना अनोखा अनुभव प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांनी दिला. निमित्त होते दैनिक ‘दिव्य मराठी’ आणि पुण्याच्या व्हायोलिन अकादमीच्या वतीने होरायझन स्कूल ग्राउंड येथे आयोजित ‘स्वरझंकार’ या लिसनर्स ग्रुप ऑफ नाशिक संगीत महोत्सवाचे.
मारु बिहाग रागातील एकतालात बांधलेली ‘रसिया ओ ना जा’ या रचनेचे गायन करताना अभ्यंकर यांनी या वेळी वातावरणात गोदाप्रवाहाची अखंड हुरहूर निर्माण केली. ‘मन भावन आयो’ या बंदिशीतून त्यांनी उल्हसित करणारे भाव निर्माण करीत उत्कट अशी उत्फुल्ल भावाभिव्यक्ती साकारली. ‘झनक रही हैं मोरी पायलिया’ म्हणत त्यांनी पैंजणांची रुणझुणच जणू प्रत्यक्षात साकारली. ‘प्रीत पियाकी जागी जियामें’ म्हणत त्यांनी प्रेमभाव निर्माण केला. ‘निर्मल चित तो सोयी साचो, रसना जो हरी गुण गावे’ ही र्शीकृष्णाचे गुणगान गाणारी सूरदासांची बंदिश सादर करून त्यांनी या सुरांच्या मैफलीमध्ये भक्तिरंग भरला.
‘ध्यान लागले रामाचे’ या अभंगातून श्रीरामापाशी लीन होण्याचा अनुभव त्यांनी रसिकांना दिला. त्यांना तानपुर्‍यावर भक्ती बोरसे, संवादिनीवर मिलिंद कुलकर्णी यांनी साथ केली, तर तबल्यावर रोहित मुजुमदार यांनी साथ केली. या वेळी दैनिक ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, मेटच्या संचालिका शेफाली भुजबळ, खासदार समीर भुजबळ, आमदार अनिल कदम, आमदार जयवंत जाधव, नंदन बिल्डकॉमचे नीलेश कोतकर, फडणीस उद्योग समूहाचे मनोज कुलकर्णी, लिसनर्स ग्रुप ऑफ नाशिकचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यास नंदन बिल्डकॉन लिमिटेड, फडणीस उद्योगसमूह यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वेदर्शी थिगळे यांनी केले.