आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील प्रकार; होर्डिंग्जवरही भाजपचे ‘एकला चलो’ रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीमुळे शिवसेना-भाजप युतीत निर्माण झालेला तणाव दूर करण्यात काही प्रमाणात भाजप श्रेष्ठींना यश आले, मात्र आता नाशिकसह विविध मतदारसंघांत सेनेचा उमेदवार असताना भाजपलाच मतदान करा, असे भव्य होर्डिंग्ज मोदींच्या छायाचित्रांसह झळकू लागल्याने यामागे नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण होऊन महायुतीत पुन्हा तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

एकीकडे शिवसेना, भाजपा-रिपाइं आठवले गट-स्वाभिमानी संघटना यांची महायुती होऊन त्यांच्या प्रमुख नेत्यांचा प्रचार व जाहीर सभांचा धडका सुरू आहे. तथापि गडकरी-राज ठाकरे यांच्या भेटीने आणि त्यानंतर मनसेकडून शिवसेनेच्या उमेदवारांविरोधातच उमेदवार उभे करून निवडून येणारा प्रत्येक उमेदवार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देईल, असे जाहीर केल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. या घडामोडीनंतर शिवसेनेकडून युती तोडण्याची भाषा केली गेली. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारयंत्रणेवरही त्याचा परिणाम होऊन युतीतील संबंध दुरावल्याचे चित्र होते. परंतु भाजपच्या संघटनमंत्र्यांनी शिवसेनेच्या संपर्कमंत्र्यांसोबत दोन्ही पक्षांतील पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन त्याचे पॅचअप केले. मात्र, तो फार काळ टिकला नाही.

भाजपच्या होर्डिंग्जमुळे तणाव
शहरात भाजपकडून मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. यापूर्वीच्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्येही अटलबिहारी वाजपेयी यांच्या छायाचित्रासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे तर त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्या छायाचित्रासोबतही शिवसेनेच्या नेत्यांचे तसेच होर्डिंग्ज, प्रचारपत्रकांवर युतीतील घटक पक्षांचे पक्षचिन्ह असायचे. परंतु या होर्डिंग्जवर केवळ नरेंद्र मोदी यांचे मोठे छायाचित्र असून त्यावर भाजपला मतदान करा, कॉँग्रेसचे भ्रष्ट सरकार खाली खेचा, असाच मजकूर आहे.

केवळ नाशिक शहरातच नव्हे तर संपुर्ण देशभरात पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचे होर्डीग्ज लावण्यात येत आहे. होर्डीग्जचा नमुना राष्ट्रीयपातळीवर ठरला असावा. यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांचा समावेश नसला तरी महायुतीच्या माध्यमातून निवडणूका लढविल्या जात असल्याने त्यात काही वादाचा प्रश्न नाही. --प्रा. सुहास फरांदे- भाजपा प्रवक्ता