आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी दोन एकर जागेची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकमध्ये उत्पादित इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसाठी ब्राउनफिल्ड क्लस्टरची अर्थात इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरची उभारणी शक्य असून, त्यासाठी एमआयडीसी दोन एकर जागा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तसेच केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी उद्योजकांनी पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक क्लस्टर स्थापनेसाठी निमा हाउसमध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत सूर्यवंशी म्हणाले, ‘इलेक्ट्रिकल क्लस्टरसाठी शंभर एकर जागा देणे एमआयडीसीला तूर्तास शक्य नसल्याने ग्रीन फिल्ड क्लस्टर साकारणे शक्य नाही. मात्र, स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची गरज पाहता ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ सुरू करणे शक्य आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही होण्यासारखी आहे. हे ब्राउनफिल्ड क्लस्टर भविष्यात होऊ शकणार्‍या ग्रीनफिल्ड क्लस्टरसाठी पूरक ठरणार असल्याने सध्या ‘ब्राउनफिल्ड’वर लक्ष केंद्रित करून गरजेसह कृती आराखडा संचालनालयाला त्वरित पाठवला पाहिजे.

व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, एमआयडीसीचे तांत्रिक सल्लागार व्ही. एल. राजळे आदी होते. उद्योजक के. आर. बेदमुथा, मंगेश अपशंकर, किशोर व्यास, नरेंद्र हिरावत, मधुकर ब्राह्मणकर, प्रदीप बूब, मंगेश पाटणकर, प्रदीप पेशकार, राजन सराफ, मनीष कोठारी, मिलिंद राजपूत, प्रकाश बाली, आर. सी. पाटकर, राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते.

ग्रीन, ब्राउनफिल्ड म्हणजे..
उभारणीच्या स्थितीतील कंपन्यांना आवश्यक सामायिक सुविधा मिळण्यासाठी स्थापन केल्या जाणार्‍या क्लस्टरला ग्रीन फिल्ड क्लस्टर म्हणतात, तर कार्यरत कंपन्यांसाठी उभारावयाच्या क्लस्टरला ब्राउनफिल्ड क्लस्टर म्हणतात.

आयटी डेस्टिनेशनची नाशिकमध्ये क्षमता
आयटी कंपन्यांनी आपली सुरुवात मेट्रो सिटीज आणि टायर टू शहरांतून केली. या क्षेत्रातील मोठय़ा कंपन्या आता खर्च कमी करण्यासाठी टायर टू आणि टायर थ्री शहरांकडे वळले आहेत. त्यामुळे सुवर्णत्रिकोणातील नाशिक आणि नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकणारी विमानसेवा यामुळे आयटी उद्योगात विकासासाठी मोठी संधी आहे. यामुळे शहराची क्रयशक्ती वाढेल व आर्थिकस्तरही उंचावेल. एमआयडीसी म्हणून आमच्याकडे जागेची मागणी करण्यासाठी येणार्‍या अनेक मोठय़ा कंपन्यांना आम्ही नाशिकचा पर्याय सुचविला; मात्र नाशिकमध्ये जागा नाही. एमआयडीसीकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, नवीन जागा कशा संपादित करता येतील, याबाबत निमासारख्या उद्योजकांच्या संघटनांनाही पुढाकार घेण्याची गरज आहे. नाशिकमध्ये साकारण्यात आलेल्या आयटी पार्कचा हेतू कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही आणि आयटी संलग्नच संस्था येथे सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहे. औद्योगिक सादरीकरणासाठी एमआयडीसी हैद्राबाद ते बंगळुरू या रोड-शोमध्ये नाशिकच्या ब्रॅँडिंगसाठी उत्तम संधी आहे.

‘व्हिजन-2020’
2020 पर्यंत सध्या आयात होणार्‍या कच्च्या तेलापेक्षाही अधिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात करावी लागून प्रचंड विदेशी चलन खर्च होणार असल्याचे केंद्राच्या लक्षात आल्याने ‘राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स योजना’ हाती घेतली आहे. त्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला असून, देशभरात इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर साकारत आहेत.