आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांनी अधिकार्‍यांना कोंडले, येवल्यातील घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - मागील महिन्यात येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान होऊन बळीराजा उद्ध्वस्त झाला. मात्र प्रशासकीय कर्मचार्‍यांनी योग्य पंचनामे न केल्यामुळे 1100 पैकी केवळ 246 शेतकरीच शासकीय मदतीसाठी पात्र ठरले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुरेगाव रास्ता येथील शेतकर्‍यांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तलाठी, कृषी अधिकारी व ग्रामसेविकेला दोन तास कोंडून ठेवले.
सुरेगाव रास्ता गावातील पिकांच्या नुकसानीचे सरकारी कर्मचार्‍यांनी कार्यालयात बसूनच पंचनामे केले. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या नुकसानीची नोंद सरकारी अहवालात झाली नव्हती. काही शेतकर्‍यांनी सोमवारी येवला येथील कृषी विभागाचे कार्यालय गाठले. येथे तलाठी पी. एस. चोपडे यांनाही बोलावून घेतले होते. मंडल कृषी अधिकारी ए. पी. जाधव व पी. एस. चोपडे यांना जाब विचारून या शेतकर्‍यांनी त्यांना प्रत्यक्ष नुकसानीच्या पाहणीसाठी गावात बरोबर नेले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ग्रामसेविका एस.यू. गौतम यांनाही बोलावून घेण्यात आले. मात्र या तिघांनीही समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांना दोन तास कोंडून ठेवले. दरम्यान, तहसीलदारांच्या आश्वासनामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. मात्र निवडणूक निकालानंतर मदत न मिळाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तहसीलदारांचे आश्वासन
शेतीचे खरे पंचनामे होत नाहीत तोपर्यंत अधिकार्‍यांना सोडणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राम भालसिंग, तहसीलदार शरद मंडलिक यांनी तातडीने गावात धाव घेतली. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे मंडलिक यांनी आश्वासन दिल्यानंतर अधिकार्‍यांची सुटका करण्यात आली.