आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक फेस्टिव्हलची यादगार सांगता; तारे-तारकांच्या उपस्थितीने नाशिककर खुश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अनिल कपूर, शान, अझरुद्दिन, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, शेखर सुमन, ईशा कोप्पीकर, अमिषा पटेल, इरफान खान.... रुपेरी-चंदेरी दुनियेतील या तारे-तारकांच्या झगमगत्या उपस्थितीने रविवारची रात्र नाशिककरांसाठी यादगार ठरली. आठवडाभर चाललेल्या नाशिक फेस्टिव्हलची सांगता ‘झकास’ अन् ‘शान’दार झाली.
सद्दी गली भुलके भी आया करो, कोंबडी पळाली, दिल मेरा हर बार, ढगाला लागली कळं, हिल हिल पोरी हिला, जबसे तेरे नैना, उ ला ला उ ला ला, ऐ जी ओ जी... अशा एकाहून एक हिंदी-मराठी, नव्या-जुन्या गाण्यांनी नाशिककरांच्या उत्साहाला उधाण आले. दिवसभर पतंगबाजीचा जल्लोष, सायंकाळी तीळगुळातून वाटलेला आणि रात्री झिंग चढवणारी गाणी.. नाशिककरांच्या दृष्टीने कालचा रविवार वर्षानुवर्षे लक्षात राहील, असा ठरला. संपूच नये असा हा स्वप्न सोहळा अनंत कान्हेरे मैदानावर फेस्टिव्हलच्या ग्रॅँड फिनालेच्या निमित्ताने नाशिककरांनी अनुभवला.
शानचे ‘जबसे तेरे नैना’ असो वा ईशा कोप्पीकरचा ‘कोंबडी पळाली’वरचा मराठी ठुमका, अनिल कपूरने आगमन करताच ठोकलेली ‘झकास’ अशी आरोळी, अमिषाच्या ‘कहो ना प्यार है’ची साद.. नाशिककर जणू रुपेरी दुनियाच नाशिकमध्ये अवतरली असल्याची अनुभूती घेत होते. टाळ्या, शिट्या, जल्लोष, रोषणाई, फटाके यांच्या आतषबाजीला काही सुमारच नव्हता. जोडीला मृणाल कुलकर्णी व प्रसाद ओकचे सूत्रसंचालन कार्यक्रमात रंगत आणत होते.
केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय, पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार समीर भुजबळ यांच्यासह शहरातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, उद्योग-व्यवसाय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासह होते प्रचंड खुश झालेले हजारो नाशिककर.
लावण्यांचे फ्यूजन - ‘रेशमांच्या रेघांनी’, ‘जाऊ द्या ना घरी’, ‘आला थंडीचा महिना’ आदी लावण्यांचे फ्यूजन, छबी सोधानी गायलेली गणेशवंदना आणि ‘हो गयी मै दिवानी तेरी दिवानी’, ‘आज की रात होना है क्या’ ही गाणीदेखील नाशिककरांचे मन जिंकून गेली.
फेस्टिव्हलअंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम पुरस्कार जिंकणा-या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभही या वेळी पार पडला.
क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या न्यू स्टार संघास भारतीय संघाचे माजी कर्णधार महम्मद अझरुद्दिन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. जलतरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुनील बागुल, दत्ता गायकवाड व लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते झाले. मुलींमध्ये श्वेता शार्दुल, तर मुलांमध्ये नचिकेत बुजरुक व जुनेद खान चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ठरले.
भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण फिरोज मसानी व अतुल चांडक यांच्या हस्ते झाले. भजन स्पर्धेतील महिला गटाचा पुरस्कार लासलगावच्या स्वरांजली मंडळास, तर पुरुष गटाचा पुरस्कार नाशिकच्या गणेश भक्त मंडळास देण्यात आला. कुस्ती, खो-खो, कबड्डी आदी स्पर्धांचेदेखील पारितोषिक वितरण झाले.
मायमराठीचा जागर - शानने ‘हिल पोरी हिला’, ‘ढगाला लागली कळ’ गाऊन मायमºहाटीचा जागर केला. प्रेक्षकांममध्ये येऊन त्याने ‘इट्स अ टाइम टू डिस्को’ गात धमाल केली.
अनिल कपूरचा लखन ‘ए जी ओ जी लो जी सुनो जी’ या गाण्यावर केलेल्या नृत्यातून सगळ्यांची दाद मिळवून गेला. छगन भुजबळ यांना तो याच गाण्याच्या तालावर स्टेजवर घेऊन आला.
‘विरार का छोरा’चा जलवा - गोविंदाने ‘तेरा ये जलवा’मधून दाखवलेला जलवा नाशिककरांचा ‘वन्स मोअर’ मिळवून गेला.
शानचा मराठमोळा परफॉर्मन्स - तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत झालेल्या शानने ‘दुनिया में लोगों ने दिल अपने फिर थामे’, बॉडीगार्डमधले ‘दिल कहे क्या राज है’, ‘अश्विनी ये ना’, देसी बॉइजमधले ‘लडकी लडकी अब जाने दे’, सावरियॉँमधले ‘जबसे तेरे नैना’ तारे जमीं परमधील ‘बम बम भोले मस्ती में डोले’ फनाहमधले ‘चांद सिफारिश करता हमारी’, थ्री इडियट्समधले ‘बहती हवासा था वो’ अशी गाणी मोठ्या जोशात सादर केली.