आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक फेस्टिव्हलमध्ये मराठी भाव-भक्तिगीतांची बरसात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘पाऊस आला, चिखल झाला,
नदीला आला पूर,
कुठे जाता तुम्ही दूर,
तुमचे इथेच पंढरपूर’

म्हणत ‘चंद्रभागेच्या तीरी, उभा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जयहरी’ गीत सादर करत गोदाकाठी पंढरी दुमदुमवून प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी भक्तीरस भवतालच्या मंदिरांमध्ये घुमवला अन् ही मैफल नाशिककरांना मुग्ध करत गेली. निमित्त होते भुजबळ फाउंडेशन आयोजित ‘नाशिक फेस्टिव्हल’मधील मराठी भावगीत मैफलीचे. सप्तसुरांचा खजिनाच या वेळी सारेगमप फेम प्रथमेश लघाटे, आदर्श शिंदे व अजित परब, कार्तिकी गायकवाड, मीना परुळेकर-निकम, जान्हवी प्रभू-अरोरा आदी कलाकारांनी नाशिककरांसमोर सादर केला.

अजित परब यांनी हनुमानाच्या सहस्त्रबळाचे स्मरण करणारे ‘ बोला जय हनुमान’ हे स्फुरण चढविणारे गाणे गायले अन् संथ वाहणारी गोदामाई जणू खळखळ वाहायला लागल्याचा भास काठावर निर्माण झाला. प्रथमेश लघाटेच्या आवाजातील ‘अवघे गरजे पंढरपूर’ या गाण्याने तर गोदातटी वारकर्‍यांची दिंडीच उभी केली. अजित परबबरोबर प्रथमेश याने पुढे ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे गायले अन् भक्तिरसाचा उत्कट कळसच त्यांनी चढवला. मीना परुळेकर-निकम यांनी ‘ज्योती कलश झलके’सारख्या अवीट रचना गाऊन दिव्यांची ओंजळ गोदामाईला वाहिली.

‘जणू जन्मले नव्याने, माथी भरता मळवट’ म्हणत ‘त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका’ हे मालिकेचे गाजलेले शीर्षकगीत या वेळी गीताच्या मूळ गायिका जान्हवी प्रभू-अरोरा यांनी सादर केले अन् महिलावर्गाच्या मनाची पकड घेतली. पुढे अजित परब यांनी सादर केलेले गीतरामायणही भक्तिभाव मनामनांत पेरून गेले. कार्तिकी गायकवाडने सादर केलेले ‘अरे कृष्णा, अरे कान्हा’ या गीताला प्रेक्षकांच्या शिट्या मिळाल्या. ‘सारेगमप’च्या वाद्यवृंदाने सुरेल साथ केली. या वेळी खासदार समीर भुजबळ, तुकाराम दिघोळे, सचिन महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नीलेश साबळे यांनी केले.
गाणी जुनी आली पाखरांच्या ओठी

जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची खास उपस्थिती

प्रसिद्ध कवी-गीतकार, शब्दांचे जादूगार जावेद अख्तर व प्रसिद्ध अष्टपैलू अभिनेत्री शबाना आझमी यांच्या आगमनाने नाशिककर या दोघांच्या कितीतरी आठवणींनी हर्षोल्हासित झाले. सत्काराला उत्तर देताना उभयतांनी सांगितले की, शहरांचा विकास होत असताना संस्कृती व परंपरांचा र्‍हास होत जातो. मात्र, नाशिककरांनी संस्कृती व कलेचे जतन केल्यामुळे या शहराचा खर्‍या अर्थाने परिपूर्ण विकास झाला आहे.