आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळ नव्हे, कार्बाइड मार्केट; अन्न व औषध सहआयुक्तांचा तपासणी अहवालही संशयास्पद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंचवटीतील पेठरोडवरील शरदचंद्र पवार फळ मार्केटमध्ये आंबे पिकविण्यासाठी वापरले गेलेले काही टन कार्बाइड हे आरोग्यासाठी अत्यंत घातक रसायन आढळले. यंदा आंब्याच्या हंगामात सर्वच ठिकाणी या घातक रसायनाचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने सुरुवातीला काही व्यापार्‍यांवर कारवाई केली; मात्र यानंतर अचानक ऐन हंगामात कारवाईचे सत्र का थांबवले, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

या फळ मार्केटमधून शहरातील किरकोळ विक्रेते फळ खरेदी करतात. येथील व्यापारी बाहेरील राज्यातून ट्रकने कैर्‍या आणतात आणि मार्केटमधील गाळ्यांमध्ये पिकवतात. कुठल्याही रसायनाचा वापर न करता आंबा पिकविला जातो, असा दावा येथील व्यापार्‍यांनी केला असला तरी मार्केटच्या पाठीमागील बाजूस आंबा पिकवण्यासाठी वापर केल्यानंतर फेकून दिलेल्या कार्बाइडच्या पाकिटांनी हौद भरलेला आहे. मार्केटच्या आवारात कार्बाइडच्या पाकिटांचा खच पडलेला आहे. याबाबत काही व्यापार्‍यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी अगदी गमतीदार उत्तरे दिली, तर कारवाईबाबत बाजार समिती प्रशासनातील अधिकार्‍यांना विचारले असता, त्यांनी सात व्यापार्‍यांवर सुरुवातीला कारवाई केल्याचे सांगितले. या व्यापार्‍यांनी थोड्याच प्रमाणात कार्बाइडचा वापर केल्याचे सांगण्यात आले. मात्र, यानंतर मार्केटच्या पाठीमागे आढळलेल्या व परिसरात फेकलेल्या पाकिटांकडे समितीच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष का झाले, असा प्रश्न उपस्थित होतो. या बाबीकडे लक्ष वेधले असता, अन्न व औषध प्रशासनाला कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे सांगून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न या अधिकार्‍याने केला. अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांचा आंबा तपासणी अहवाल संशयास्पद असल्याचेही उघडकीस आले आहे. या घातक प्रक्रियेमध्ये सर्वांचे हात (कार्बाइडने) गरम झाले असल्याची एकप्रकारे पुष्टी मिळत असल्याचे बोलले जात आहे.
मार्च : केशर- चार ते पाच हजार, हापूस- सहा ते सात हजार, बदाम- 1500 ते 2500, तोतापुरी- एक ते दीड हजार. (रुपये प्रतिक्विंटल)

अशी झाली आंबा आवक
मार्च- 351 क्विंटल, एप्रिल- 1290 क्विंटल, मे - 4177 क्विंटल, जून - 6312 क्विंटल.

असा होता भावविक्रेत्यांनी पाकिटे फेकली
व्यापारी आंबा पिकवण्याकरिता कार्बाइडचा वापर करत नाहीत. काही विक्रेते आंब्याचे क्रेट्स परत करतेवेळी ही पाकिटे येथे फेकतात. कमालउद्दीन, जे. के. अँण्ड ब्रदर्स फ्रूट कंपनी

सात व्यापार्‍यांवर कारवाई
बाजार समिती प्रशासनाने सात व्यापार्‍यांवर कारवाई केली आहे. व्यापार्‍यांना नोटिसा पाठवल्या. कारवाई करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे. ए. बी. शेवाळे, सहसचिव, कृषी समिती

काय आहे अहवालात?

अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांनी हरिओम फ्रूट कंपनीला पाठवलेला अहवाल पुढीलप्रमाणे : तपासणीच्या वेळी मालक दुकानात नव्हता. अन्न परवाना दाखवला नाही. पेढीमध्ये दोन कामगार असून, त्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नाही. पेढीमध्ये प्लास्टिक क्रेट्समध्ये वर्तमानपत्रात लपेटून आंबे पिकवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आढळले. याबाबत विचारले असता वरील पद्धतीनेच आंबा पिकवला जातो, असे उपस्थित व्यक्तीने सांगितले. कृत्रिमरीत्या आंबा पिकवला जात नसल्याचेही त्याने सांगितले. पेढीतील क्रेट्सचा तपासणी अहवाल 14 मे 2013 रोजी देण्यात आला. यावर अन्नसुरक्षा अधिकारी स. शि. देवरे यांची स्वाक्षरी आहे. मात्र, या अधिकार्‍यांनी कधीच बाजार समितीमध्ये तपासणी केली नाही, तर व्यापार्‍यांमधील वादातून कारवाई केल्याची पुष्टी या अहवालामुळे मिळते.