आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांबरोबर आरास स्पर्धेचेही सार्वजनिक मंडळांकडून उत्स्फूर्त स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लाडक्या बाप्पांचे घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहात आगमन झाले. बाप्पा विराजमान झाले असले तरीही अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये आरास तयार करण्याचे काम सुरू आहे. बाप्पांच्या आकर्षक सजावटीसाठी ‘दिव्य मराठी’ व संत गाडगेमहाराज पतसंस्थेतर्फे ‘आरास बाप्पांची’ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, मंडळांकडून या स्पर्धेचेही उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे.

गणरायाच्या आगमनाने भक्तिमय वातावरण आहे. आरती आणि धार्मिक गीतांमुळे शहर गणेशमय झाले आहे. या धार्मिक उत्सवाचा प्रारंभ झाला असून, मंडळांचे कार्यकर्ते देखावे पूर्ण करण्यासाठी मेहनत करीत आहेत. या मेहनतीचे चिज करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ व संत गाडगे महाराज पतसंस्थेच्या वतीने आरास स्पर्धेचे आयोजन केले आहे. उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट समाजप्रबोधनपर आणि पर्यावरणपूरक देखावा व शिस्तबद्ध मिरवणूक या निकषांच्या आधारावर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या मंडळांना विभागवार प्रत्येकी तीन क्रमांकांचे व एक उत्तेजनार्थ अशी 24 पारितोषिके देण्यात येणार आहेत.

सदर स्पर्धा नि:शुल्क असून, सहभागी होण्यासाठी खालील अर्ज भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक विभागानुसार बक्षिसांची योजना करण्यात आली आहे. त्यात पूर्व, पश्चिम, पंचवटी, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड या भागांचा समावेश आहे. बक्षीस समारंभाची तारीख ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध करण्यात येईल. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम असून, मंडळांचे देखावे पाहण्यासाठी परीक्षक कधीही देखावास्थळी येऊ शकतात. मंडळाने दर्शनीय भागात बॅनर लावणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी सोनगिराज मिहीर हर्बल्स आणि र्शी राजे सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव बर्वे, उपाध्यक्ष श्यामसुंदर काबरे व अन्य पदाधिकार्‍यांनी केले आहे.

अर्जासाठी मुदत
‘उत्सव गणरायाचा’ आरास स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 13 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत अर्ज भरता येतील. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद मंडळांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 0253-2500319 किंवा 9975547616 या क्रमांकांवर संपर्क साधावा.