आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांच्या घोषणेचा पालिकेलाच विसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकमध्ये असलेली 450 उद्याने विकसित झालेलीच नाहीत. त्यामुळे भविष्यात उद्यानांच्या जागांसह मोकळ्या भूखंडांवर खेळांसाठीची मैदाने विकसित करण्यावर भर देणार असल्याची घोषणा महापौर यतिन वाघ यांनी गतवर्षी डिसेंबर महिन्यात महापौर चषकाच्या शुभारंभ सोहळ्यात केली होती. ही घोषणा वर्षभरानंतरही प्रशासनासह महापौरही विसरले असल्याचे चित्र आहे.

शहरातील खेळाडूंना भरपूर वाव मिळावा, यासाठी उद्यानांऐवजी मैदानांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेने सध्या 450 उद्याने व 1000 मोकळे भूखंड असून, या ठिकाणी गरजेनुसार खेळाचे मैदान तयार करून देण्याचा मानस असल्याचे महापौरांनी नमूद केले होते. मात्र, ही योजना जाहीर केल्यानंतर त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने काही पावलेच उचलली गेली नाहीत.

चांगली योजना हवेतच विरली
प्रत्येक भागातील नगरसेवक आणि नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या गरजेनुसारच खेळांची मैदाने विकसित केल्याने सर्वच प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन मिळू शकणार होते. ही मैदाने विकसित करताना त्या खेळातील तज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेतले जाणार असल्याने त्यातूनच विभिन्न खेळांमधील राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यास मदत मिळू शकणार होती. योजना खरोखरच चांगली होती. मात्र, ती कागदावर आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीत आलीच नसल्याने योजना हवेतच विरल्यातच जमा आहे.

शासनाची मदत होऊ शकते
राज्य शासनाची ‘क्रीडांगण विकास अनुदान योजना’ असून, या योजनेंतर्गत महानगरातील मैदानांचे लेव्हलिंग, फेन्सिंग, 200 मीटर ट्रॅक तयार करणे, विविध खेळांची मैदाने तयार करणे, पाणीव्यवस्था आणि अन्य व्यवस्था उभारणे यासाठी प्रत्येक टप्प्याकरिता दोन लाख रुपये याप्रमाणे सात टप्प्यांसाठी हा निधी दिला जाऊ शकतो. ही योजना महापालिका हद्दीतील मैदानांच्या विकासासाठीही लागू आहे. त्यामुळे महापालिकेकडे निधीचा अभाव असल्यास अशा योजनेचा वापर करूनही ती योजना राबविणे शक्य आहे.

विकासासाठी निधी शक्य
खेळांसाठीची मैदाने विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडून मैदानांकरिता प्रत्येक टप्प्यात दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे शक्य आहे. तर, शालेय संस्थांच्या मैदानासाठी खर्चाच्या पन्नास टक्के किंवा फार तर दोन लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देणे शक्य आहे. संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी