आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्ड् कॉल द्या आणि गॅस सिलिंडर मिळवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - घरगुती गॅस सिलिंडरचे सुलभ वितरण करण्यासाठी सुरू केलेल्या हायटेक यंत्रणेचे पुढचे पाऊल म्हणून मिस कॉल द्या आणि सिलिंडर मिळवा, अशी अभिनव योजना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने सुरू केली आहे. ‘आय.व्ही.आर.एस.’ असे योजनेचे नाव असून, महाराष्ट्राकरिता 9420456789 हा क्रमांक खुला करण्यात आला आहे. नोंदणीकृत असाल तर, चोवीस तासात कधीही या क्रमांकावर मिस कॉल दिल्यावर गॅसची नोंदणी होणार आहे.

बीपीसीएलचे वेस्टर्न रिजनचे व्यवस्थापक सुरेश नायर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, घरगुती गॅसची नोंदणी करण्यासाठी यापूर्वी दूरध्वनीचा पर्याय होता. वितरकाकडे फोन केल्यावर नोंदणी व्हायची. त्याचप्रमाणे बीपीसीएलच्या संकेतस्थळावरही नोंदणी करता येत होती. त्यानंतर एस.एम.एस.द्वारे नोंदणी करण्याची सुविधा दिली गेली. यापूर्वी वितरकाकडील दूरध्वनीवर फोन करून वा संबंधित रिचनसाठी दिलेल्या दूरध्वनीवर एस.एम.एस. करून नोंदणी करता येत होती. मात्र, आता महाराष्ट्रात कोठेही नोंदणी करायची असेल तर एकच क्रमांक दिला आहे. या सुविधेमुळे गॅस ग्राहकांना सिलिंडरसाठी एजन्सीकडे खेटे मारण्याची गरज राहणार नाही.

अशी करा नोंदणी
पहिल्यांदाच टोल फ्री क्रमांकावर गेल्यानंतर विविध पर्याय सांगितले जातील. आपला गॅस क्रमांक नोंदवल्यानंतर त्यासोबत ज्या दूरध्वनी वा मोबाइलवरून संपर्क केला जाईल, त्याची नोंद सॉफ्टवेअर घेईल. त्यानंतर केवळ मिस कॉल जरी दिला तर, तुमच्या गॅसची नोंद होईल. त्यानंतर भ्रमणध्वनी असेल तर तातडीने बुकिंगचा मॅसेज येईल. सिलिंडर वितरीत झाल्यानंतरही त्याची माहिती देणारा एस.एम.एस. ग्राहकांना येईल.

ग्राहकांचा ताण कमी होईल
यापूर्वीच्या योजनेला अद्यावत करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्राकरिता एकच क्रमांक दिला आहे. केवळ ग्राहकाने नोंद करून त्यानंतर एक मिस कॉल दिला तरी, त्याचा सर्व डाटा उपलब्ध होऊन वितरकाकडे बुकिंग पाठवले जाईल. 24 तास सेवा असल्यामुळे ग्राहकांचा ताण कमी होईल. तुषार जगताप, विक्री अधिकारी, नाशिक