आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणाली प्रकरणी महिला रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सहकार्‍यांच्या छळाला कंटाळून प्रणाली रहाणे या प्रशिक्षणार्थी तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या दहा संशयितांवर कठोर कारवाई करावी आणि कंपनीच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करावा, या प्रमुख मागण्यांसाठी शिंपी समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.

महिलांनी तोंडावर पट्टी बांधून बी. डी. भालेकर मैदानापासून सकाळी 10 वाजता मोर्चा सुरू केला. पुढे शिवाजी उद्यान, महात्मा गांधीरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंपनी व्यवस्थापनाचा निषेध नोंदवून जिल्हाधिकारी विलास पाटील यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चात लहान मुलींसह महिला व नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. शिंपी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर, प्रदीप जगताप, विजय बिरारी, डॉ. विजय बिरारी, शोभा कराडकर, नंदन राहाणे, मधुकर कापडणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उज्‍जवल निकम यांना नेमावे
रॅगिंगला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ आलेल्या प्रणालीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात यावा. कंपनी व्यवस्थाकांवर गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहा संशयितांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील उज्‍जवल निकम यांची नेमणूक करावी. अरुण नेवासकर, प्रदेशाध्यक्ष, शिंपी समाज

सर्वांनी पुढे यायला हवे
गुणवत्ता आणि कौशल्यांच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचू पाहणार्‍या प्रणालीसारख्या महत्त्वाकांक्षी युवतीला तिच्याच वयाच्या मुलींनी त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तिचा छळ करणार्‍या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी समाजातील सर्वांनी पुढे येऊन व्यवस्थेवर दबाव निर्माण करावा. स्मिता राहाणे, नातेवाईक

गाइडलाइन्सची अंमलबजावणी व्हावी
प्रणालीच्या आत्महत्येने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च् न्यायालयाच्या आदेशावरून विशाखा समितीच्या गाइडलाइन्सची अंमलबजावणी व्हावी, गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे आणि प्रणालीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. कल्पना धोंगडे, प्रणालीचे नातेवाईक

कुटुंबीयांना मिळावा न्याय
वाढत्या अत्याचारामुळे समाजात वावरताना महिलांना असुरक्षित वाटू लागले आहे. त्यातच औद्योगिक क्षेत्रात प्रक्षिणार्थी म्हणून काम करणार्‍या तरुणीचा असा छळ होत असेल, तर हे गंभीर आहे. प्रणालीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व सुरक्षितता मिळाली पाहिजे. सचिन कुलकर्णी, मनसे

मनसे काढणार मूकमोर्चा
सहकार्‍यांकडून होणार्‍या सततच्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपविणार्‍या प्रणालीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी 7 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता इंदिरानगरमध्ये मनसे नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी व यशवंत निकुळे यांच्या नेतृत्वाखाली रथचक्र चौकातून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. इंदिरानगर परिसरातील प्रमुख मार्गांवर हा मोर्चा निघेल. त्यानंतर 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येईल.