नाशिक - दिल्लीत झालेल्या ‘अब्राक्सस गॉडेस ऑफ ब्युटी २०१७’ या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत नाशिकच्या दोन कन्यांनी बाजी मारली. त्यात श्रिया स्वप्नील तोरणे ही मिस टीन युनिव्हर्स इंडिया तर भैरवी प्रदीप बुरड ही मिस ग्लाेबल इंटरनॅशनल ठरली. आपापल्या गटात विजेतेपद पटकावल्याने या दाेन्ही नाशिककर कन्या आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या स्पर्धेसाठी देशभरातून अालेल्या सर्व साैदर्यवतींमधून श्रिया स्वप्नील ताेरणे हिने मिस टिन युनिव्हर्स इंडिया या स्पर्धेचे विजेतेपद तसेच मिस ब्युटिफुल आईज हा किताब पटकावला अाहे. श्रिया २०१८ च्या फेब्रुवारीत मिस टिन युनिव्हर्स या सेंट्रल अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भैरवी प्रदीप बुरड हिने या स्पर्धेत मिस ग्लोबल इंटरनॅशनल हे विजेतेपद आणि बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजूनीअॅलिटी हा किताब पटकावला. भैरवी ही सप्टेंबरमध्ये जमैकात होणाऱ्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कु. श्रिया आणि कु. भैरवी यांची निवड पश्चिम भारत या विभागातून झाली होती. मिस टीजीपीसी या ऑनलाइन पेजंटमध्ये २०१६ साली भैरवीने तर २०१७ साली श्रीयाने विजेतेपद पटकावले होते.