आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदापार्क प्रकल्पासाठी अखेर शनिवारचा मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी विकासकामे सुरू करण्याचा धडाका बहुतांश पक्षांनी लावला असतानाच मनसेनेही पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वप्नातील ‘गोदापार्क’ प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी शनिवारचा (दि. 22) मुहूर्त निश्चित केला आहे. काहीसा दुरावा निर्माण झालेल्या मित्रपक्ष भाजपची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने मनसेकडून केला जात आहे.

कामांच्या जोरावरच आगामी निवडणुकीत मते मागता येणार असल्याचे जाणून प्रमुख दावेदार राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यात सध्या विकासकामे उद्घाटनाची चढाओढ लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोदापार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला रिलायन्स उद्योग समूहाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबरच अंबानी कुटुंबीयांपैकी कोणीतरी हजेरी लावणार असल्याचे सांगितले जाते; मात्र त्याविषयीची नेमकी माहिती मनसेच्या स्थानिक नेत्यांकडे नाही. नाशिकचे नाव पर्यटनस्थळ म्हणून अधोरेखित होण्यासाठी गोदापार्क हा अभिनव असा सुमारे 55 कोटींचा प्रकल्प साकारणार आहे.

नितीन गडकरी यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न
राज ठाकरे यांनी गेल्या नाशिक भेटीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केल्याने नाराज झालेल्या स्थानिक भाजप नेत्यांनी मनसेबरोबरची महापालिकेतील युती संपुष्टात आणण्याचे पत्र वरिष्ठांना पाठविले होते. तेव्हापासून मनसे व भाजपचे संबंध बिघडले आहेत. मनसेने राज यांच्या उपस्थितीत केलेल्या 465 कोटींच्या कामांच्या प्रारंभालाही भाजपच्या मंडळींनी हजेरी लावली नव्हती. ही नाराजी दूर करण्यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या संपर्कात असून, 22 तारखेला गडकरी नाशिकमध्येच असल्याने त्यांनी गोदापार्कच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहावे, अशी विनंती मनसेकडून केली जाणार आहे.

असा असेल पार्क
> संपूर्ण गोदापार्कचे अंतर 13.5 किलोमीटर
> साडेचार किलोमीटर जागा ताब्यात
> उजव्या तीरावर होळकर पूल ते गंगापूर गाव नऊ किलोमीटर
> रामवाडी ते आनंदवल्लीपर्यंत 4.5 किलोमीटर
> गोदावरीला समांतर 18 मीटर रुंदीच्या जागेत प्रकल्प

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
> नदीच्या एका बाजूकडून दुसरीकडे जाण्यासाठी फुटब्रिज
> जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना दुर्मिळ वनस्पतींची लागवड
> प्रकल्पात येणार्‍या झाडांची कत्तल न करता त्यांचा शिल्प म्हणून वापर
> दोन्ही बाजूस वॉटर पार्क, संगीत कारंजे, चिल्ड्रन्स पार्क
> आबालवृद्धांसाठी लेसर शो व मोनोरेल
> शिल्पे, फाइन आर्ट, विविधरंगी चित्रे

प्रकल्पाचा फायदा
नाशिकमध्ये अभिनव पर्यटनस्थळ निर्माण होईल. किमान दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. गोदावरी प्रदूषणाचा प्रश्नही कायमचा निकाली निघेल.

चार भागांत प्रकल्प
गोदापार्क सांस्कृतिक, पर्यावरण, कला आणि क्रीडा अशा भागांमध्ये राहील. सांस्कृतिकमध्ये मराठमोळे खेळ, लोककला, उत्सव यांचा समावेश असेल. पर्यावरणपूरक गोष्टींतून ‘टाकाऊतून टिकाऊ’ संकल्पना साकारली जाईल. कला विभागामध्ये इतिहास संग्रहालय, कुसुमाग्रज उद्यानासह कलांचा समावेश असून, क्रीडा या भागात विविध खेळांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल.

मनसे गट अध्यक्षांचा उद्या मेळावा
गोदापार्क भूमिपूजनाचाच मुहूर्त साधून आदल्या दिवशी 21 फेब्रुवारीला मनसेच्या गट अध्यक्षांचा मेळावा वडाळारोडवरील साहिल लॉन्स येथे होणार आहे. या मेळाव्याला आमदार बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य वरिष्ठ नेतेमंडळी हजेरी लावणार असल्याची माहिती आमदार गिते यांनी दिली.