आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदापार्कवर संकटछाया, दुसऱ्या टप्प्यातील काम रखडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘ड्रीम प्राेजेक्ट’ असलेल्या गाेदापार्कचे दुसऱ्या टप्प्यातील काम महापालिकेकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे कारण देत गुंडाळण्याच्या विचाराप्रत रिलायन्स फाउंडेशन येऊन ठेपल्याचे वृत्त अाहे. याबाबत तक्रार म्हणा वा एकूणच अडचणींची कल्पना खुद्द ठाकरे यांनाच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिल्याचेही सूत्रांचे म्हणणे अाहे.
यासंदर्भात, रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचा स्पष्ट इन्कार वा स्वीकारही केला नसून, वारंवार पाठपुरावा केल्यावर महापालिकेचा राेष अाेढावेल, अशी भीती खासगीत व्यक्त करीत माैन बाळगणेच पसंत केले अाहे. दुसरीकडे, रिलायन्सच्या माध्यमातून थेट पक्षाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची काेंडी करण्यासारखा प्रकार असल्यामुळे त्याची मनसे पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतल्याचे सांगितले जाते.

अासारामबापू पुलापासून अहिल्याबाई हाेळकर पुलापर्यंत गाेदापार्क तयार करण्याचे राज ठाकरे यांचे स्वप्न अाहे. शिवसेनेत असताना राज यांच्याच संकल्पनेतून गाेदापार्क तयार करण्याचे काम सुरू झाले. मात्र, हा पार्क प्रभावी ठरला नाही. कालांतराने मनसेच्या सत्ताकाळात पुन्हा ठाकरे यांनी या ‘ड्रीम प्राेजेक्ट’साठी कंबर कसली. या प्रकल्पासाठी माेठ्या प्रमाणात खर्च येणार असल्यामुळे रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने खासगीकरणातून काम सुरू झाले. चार टप्प्यांतील हा प्रकल्प तांत्रिक प्रशासकीय परवानगी मिळवण्याच्या किचकट प्रक्रियेत लांबणीवर पडत गेला. त्यात वारंवार विविध विषयांसंदर्भात येणारे अडथळे दूर करण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ अाले.
दरम्यान, मनसेला दाेन माेठ्या निवडणुकींत जबर फटका बसला. त्यानंतर राज ठाकरे यांनी नव्याने पुनर्बांधणीसाठी धडपड सुरू केली. नाशिकमध्ये ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क, बोटॅनिकल गार्डन, फाळके स्मारक, शिवाजी उद्यान पुनर्विकास याबराेबरच अनेक माेठे प्रकल्प करण्याचे प्रयत्न सुरू अाहेत.
अशातच मनसेसाठी गाेदापार्क हा त्यातील महत्त्वाचा प्रकल्प असून, संपूर्ण राज्यात मनसेचा ब्रॅण्डही ठरणार अाहे. अशी परिस्थिती असताना पहिल्या टप्प्यात असहकार्याच्या समस्येवर कशीबशी मात करीत काम पूर्ण करणाऱ्या रिलायन्सची गाेदापार्कचा दुसरा टप्पा करावा की नाही, अशी द्विधा मनस्थिती झाल्याचे सांगितले जाते.

परिणामी, रिलायन्सने नकार दिला, तर मनसेसाठी माेठी अडचण ठरणार अाहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे याबाबत थेट ठाकरे यांच्याकडे कैफियत मांडण्यात अाली असून, त्यांनी अावश्यक ‘पॅचअप’च्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना सूचनाही केल्याचे सांगितले जाते. पुन्हा नाशिक दाैऱ्यावर अाल्यानंतर ठाकरे कशा पद्धतीने बांधबंदिस्ती करतात, याकडे लक्ष लागले अाहे.

काय अाहे अडचण?
गाेदापार्कसाठीमहापालिकेने रिलायन्स फाउंडेशनशी करार केला असून, त्यातील अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी महापालिका पुरेसे सहकार्य करीत नसल्याची प्रमुख तक्रार असल्याचे सांगितले जाते. मध्यंतरी महापाैर अशाेक मुर्तडक यांची भेट घेऊन काही पदाधिकाऱ्यांनी वीजजाेडणी, तसेच अन्य तक्रारी मांडल्या हाेत्या. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण हाेण्याच्या मार्गावर अाहे. येथे एका माेठा ट्रान्सफॉर्मर कायमस्वरूपीची वीजजाेडणी हवी अाहे. विशेष म्हणजे, या कामात येणाऱ्या अडचणी साेडविण्यासाठी महापालिकेने स्वत:चा एक नाेडल अाॅफिसर नेमणेही अपेक्षित हाेते. मात्र, त्यासाठी काेणाचीही नियुक्ती झाल्याची प्रमुख नाराजी अाहे. प्रकल्पास विलंब झाला, तर त्याचा फटका वाढीव इस्टिमेटच्या रूपाने मक्तेदाराला बसत असताे. पहिल्या टप्प्यातील एकूणच कामकाजाची गती लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यातील कामाबाबत विचारविमर्श सुरू असल्याचे सांगितले जाते.

समन्वयासाठी स्वतंत्र जबाबदारीच नाही
गाेदापार्कसंदर्भातसमन्वयाची स्वतंत्र जबाबदारी काेणाकडेही नाही. ज्या-ज्या अडचणी येतील त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांच्या खातेप्रमुखांना सांगावे लागत असल्याचा सूर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात महत्त्वाच्या खातेप्रमुखांशी संपर्क साधल्यावर त्यांनी नाव छापण्याच्या अटीवर अापल्या विभागाशी संबंधित कामे तक्रार अाल्यानंतर करीत असल्याचे सांगितले.

गोदापार्कच्या पहिल्या टप्प्याचे फॉरेस्ट नर्सरी परिसरात सध्या सुरू असलेले काम.
आसारामबापू पुलापासून अहिल्यादेवी हाेळकर पुलापर्यंत साकारणाऱ्या गोदापार्कच्या पहिल्या टप्प्याचे काही भागात पूर्णत्वास पोहोचलेले काम.