आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदे भारी; मात्र दोघेही प्रभारी, प्रांत व तहसीलदार पदांवर तात्पुरती नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक प्रांत अधिकार्‍यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर आणि महिनाभरापूर्वीच नाशिक तहसीलदारांची महसूल चिटणीसपदी बदली झाल्याने, या दोन्ही पदांवर प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्यानंतर महत्त्व प्राप्त झालेले व जगात विकासाच्या दृष्टीने 17 व्या क्रमांकावर असलेले नाशिक शहर वार्‍यावरच सोडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रांत विनय गोसावी यांची खडीक्रशरसह काही वादग्रस्त प्रकरणांमुळे तडकाफडकी जलद बदली केल्यानंतर त्यांच्या जागी तत्काळ पूर्णवेळ अधिकारी नेमणे अपेक्षित होते. किंबहुना या अत्यंत महत्त्वाच्या विभागाच्या अधिकार्‍याची बदली करतानाच संबंधित ठिकाणी कुठल्या अधिकार्‍याची नेमणूक करावयाची याचे नियोजन करणे गरजेचे होते. परंतु त्याप्रकारचे नियोजन संबंधितांकडून न होता या जागेचा प्रभारी पदभार भूसंपादन अधिकार्‍यांकडे देण्यात आला. हे प्रभारी प्रांतही तसे या पदावर नवखेच असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत शंका आहे. दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचे आणि तीन महिन्यांपूर्वीच बनावट रेशनकार्डमुळे वादग्रस्त ठरलेल्या संवेदनशील नाशिक तहसील कार्यालयालाही पूर्णवेळ तहसीलदार नाही. येथील तहसीलदार सुचेता भामरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात चिटणीस या पदावर, तर दोन्ही नायब तहसीलदारांचीही बदली झाल्याने याठिकाणी आता आलेले नायब तहसीलदारही तसे नवखेच आहेत. याठिकाणी तहसीलदार जलद मिळण्याची शक्यताही होती, मात्र विभागीय स्तरावरील एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या र्मजीमुळे हे पद अद्याप भरले गेले नसल्याचीही चर्चा आहे.

नागरिकांची गैरसोय
या सगळ्याचा परिणाम नागरिकांना होत असल्याने पूर्णवेळ तहसीलदार मिळणे गरजेचे आहे. शाहरातील तसेच बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांचीही कामे वेळेत होत नसल्याने त्यांच्याही तक्रारी वाढत आहेत. या नागरीकांना कामासाठी तिष्टत राहावे लागत आहे.

शासनाकडून आदेश नाही
शासनाकडून अद्याप कुठलीही माहिती प्राप्त झालेली नाही. कुठल्या अधिकार्‍याची नेमणूक करावी याबाबतही आदेश नाहीत. परंतु, प्रभारी अधिकारी कामकाज पाहात आहेत. शासनाच्या आदेशाची आम्हीही वाट बघतो आहोत.
-जितेंद्र काकुस्ते, निवासी उपजिल्हाधिकारी