आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम न केल्यास आयटी पार्क भूखंड परत घेणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंबड येथील आयटी पार्कमधील भूखंड भाडेतत्त्वावर देण्यात आलेले असले तरी निर्धारित मुदतीत त्यावर ठोस काम केलेले आढळून आले नाही तर हे भूखंड संबंधितांकडून परत घेतले जाणार आहेत. उद्योगांकडून जागेची वाढती मागणी आणि जागेचा तुटवडा यामुळे हे भूखंड इतर उद्योगांना खुले करून देण्याबाबत एमआयडीसी गांभीर्याने विचार करीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

आयटी पार्क इमारतीलगत असलेल्या आयटी पार्कच्या जागेवर आयटीशी निगडित दहा व्यक्तींना सन 2009-10 याकाळात हे भूखंड दिले गेले. त्यावर अद्याप कुठलेही काम करण्यात आलेले नाही. एमआयडीसीचे सीईओ नाशिक दौर्‍यावर आले असता त्यांनी ही स्थिती पाहिली व विचारणाही केली होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मार्च ते नोव्हेंबर 2013 दरम्यान भूखंडधारकांना दिलेली विकसनाची मुदत संपत असून, या काळात एमआयडीसीच्या नियमाप्रमाणे काम केले नसेल तर भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात येतील. आयटी पार्क इमारतीकरिता उद्योजकांच्या मागणीनुसार एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाने मुख्यालयास प्रस्ताव पाठविला आहे. तेथून निविदा प्रक्रियेसंदर्भात लवकरच परवानगी मिळण्याची चिन्हे असून, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आयटीशी निगडित उद्योगांकडून गाळ्यांकरिता निविदा मागविण्यात येणार आहेत.

तर नोटिसा देणार
आयटी पार्कमधील ज्या भूखंडधारकांचे काम शासनाच्या निर्देशानुसार नकाशा मंजूर करणे, बांधकाम पूर्ण करणे यांसारख्या कुठल्याही टप्प्यात पूर्ण झालेले नसेल तर मुदत संपल्यावर नोटिसा बजावण्यात येतील. हे भूखंड इतर उद्योगांना खुले करण्याचाही विचार सुरू आहे.
-रामदास खेडकर, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी.