आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्यांकडील मोबाइलमुळे कारागृह विभाग ‘जाम’; कर्मचाऱ्यांवर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रवेशद्वारावर झडती, इलेक्ट्रॉनिक स्कॅनर आणि डिटेक्टर, अंतर्गत जॅमर या सर्व यंत्रणा कुचकामी ठरवत राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांकडून सर्रास वापरले जाणारे मोबाइल ही तुरुंग विभागाची मोठी डोकेदुखी बनली आहे. मागील आठवड्यात नाशिकरोड कारागृहातील कैद्यांसोबत मोबाइलवर संभाषण केल्याचा ठपका ठेवत दोन कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, ‘आतल्या मोबाइलचे काय?’ याचे उत्तर कारागृह प्रशासन देऊ शकले नाही. विशेष म्हणजे निरोध लावून गुदद्वारात लपवून मोबाइल आत आणणे, डीप सर्चमधून वाचवण्यासाठी कार्बनमध्ये गुंडाळून तो जमिनीत पुरून ठेवणे, शौचालयाच्या भांड्याखालील प्लास्टिकच्या पाइपाला छिद्र पाडून त्यात लपवून ठेवणे अशा शक्कल कैदी लढवत असल्याने त्याला अटकाव कसा करावा हे आव्हान प्रशासनापुढे आहे.
नाशिक रोड कारागृहातील सुरक्षा रक्षक लिपिकास ३१ ऑगस्टला निलंबित करण्यात आले. ‘डबेवाल्यामार्फत पैसे पाठवून दे’ असा संदेश मोबाइलवर आल्याने ही कारवाई केल्याची माहिती कारागृह विभागातील सूत्रांनी दिली. नाशिक रोड कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. ‘कैद्यांसोबत नियमबाह्य संबंध ठेवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली,’ असे कांबळे म्हणाले. परंतु ‘नियमबाह्य संबंध’ म्हणजे काय याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. बुटांच्या सोलमधून आत मोबाइल नेणाऱ्या होमगार्डवर आपण काही दिवसांपूर्वीच कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु मोबाइलवर ट्रॅकिंग नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी मान्य केले.
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये जॅमर बसवण्यात आले आहेत, परंतु बहुतांश कारागृहाचा परिसर मोठा खुला असल्याने हे जॅमर अनेक ठिकाणी कुचकामी ठरत आहेत. तुरुंगात मोबाइल आणणे, लपवणे वापरणे यासाठी अनेक शकला कैदी लढवत आहेत. आत आलेल्या मोबाइलचे लाभार्थी सगळेच असल्याने त्याविरोधात खबर मिळवण्यातही अडचणी येत आहेत.
अॅडव्हान्स जॅमर आणणार
^राज्यातीलकारागृहांचाविस्तृत परिसर बघता सध्याचे जॅमर मोबाइल शोधण्यात अपयशी ठरत असल्याचेच दिसून येते. त्यावर उच्च क्षमतेचे जॅमर हाच उपाय आहे. आम्ही लवकरच अॅडव्हान्स जॅमर, मोबाइल डिटेक्टर खरेदी करणार आहोत. त्यातून याला अटकाव बसेल असा विश्वास आहे. शिवाय कारागृहात मोबाइल पोहोचू नयेत यासाठी आम्ही आमची यंत्रणा अधिक सक्षम करणार आहोत. डॉ.भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलिस महासंचालक, कारागृह विभाग.
बातम्या आणखी आहेत...