आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यानाच्या जागी थाटू भाजीबाजार - अशोक सातभाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - जेलरोडला उद्यानासाठी आरक्षित असलेल्या 12 एकरपैकी एक एकर जागेवर भाजीबाजार उभारण्याचा प्रस्ताव मनसेचे नगरसेवक अशोक सातभाई यांनी सादर केला. त्यामुळे येथील उद्यानाचे स्वप्न हवेत विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावामुळे विभागात संमिर्श प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जेलरोडला भाजीबाजाराअभावी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले. येथील आरक्षित जागेवर भाजीबाजार उभारल्यास त्याचा ग्राहक व विक्रेत्यांना फायदाच होईल. रस्ते, चौक अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त होतील, अशी भूमिका सातभाई यांनी मांडली. उद्यान विकसित होत नाही तोपर्यंत विक्रेत्यांना या जागेचा वापर व्यवसायासाठी करू द्यावा, अशी मागणी महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याकडे त्यांनी केली आहे.
नगरसेवकांची परदेशवारी - म्हैसूर येथील वृंदावन गार्डनच्या धर्तीवर जेलरोडच्या प्रभाग 33 मध्ये उद्यान उभारणीचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक प्रकाश बोराडे यांनी मांडला होता. त्यानंतर विभागातील यापूर्वीच्या नगरसेवकांनी उद्यान उभारणीपूर्वी वृंदावन गार्डनची पाहणी केली. त्यासोबतच थेट परदेशातील गार्डन बघण्यासाठी बँकॉक, मॉरिशसचा दैारा केला. तत्कालीन आयुक्त भास्कर सानप यांनी प्रशासकीय ताफ्यासह जागेची पाहणी करून लाखो रुपये खर्च केले होते. उद्यानासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर काहीच तरतूद करण्यात आली नसून 12 एकरपैकी केवळ 8 एकर जागा संपादित झाली आहे. चार एकर संपादित करणे बाकी आहे.
उद्यानासाठी एवढा मोठा खर्च करणे शक्य आहे का?
फाळके स्मारक, जी. डी. सोमाणी उद्यान व इतर उद्यानांची सध्याची परिस्थिती बघता पंचक शिवारात 12 एकरवर उद्यान विकसित केल्यास ते सांभाळणे कठीण जाणार आहे. महापालिकेचा सध्याचा भांडवली खर्च बघता उद्यानासाठी आवश्यक कोट्यवधींचा खर्च करणे शक्य आहे का? महापालिकेने जमीनमालकांना आर्थिक मोबदला देऊन ताबा घेतलेल्या आठ एकर जागेवर शेतकरी आजही पीक घेत आहेत. असे असताना प्रशासन काय करत आहे? अशोक सातभाई, नगरसेवक
स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार - एकदा आरक्षित केलेल्या जागेचे आरक्षण बदलत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या उद्यानामुळे शहराची राज्यात ओळख होणार असून विभागातील बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. भाजीबाजाराचा प्रश्नही जिव्हाळ्याचा असला तरी एक अभिनव प्रकल्प त्यासाठी रोखला जायला नको, असे वाटते. प्रकाश बोराडे, माजी नगरसेवक