आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात 4 जीप जाळल्या, पोलिस चौकी समोर घडलेला प्रकार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिडकोत ट्रक पेटविण्याच्या घटनेस 24 तास उलटत नाहीत तोच द्वारका सर्कलवर पोलिस चौकीच्या समोरच चार प्रवासी जीप पेटवून दिल्याची घटना घडली. वाहने पेटवून दहशत निर्माण करण्यात येत असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत असून, पोलिसांच्या निष्क्रियतेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामाखाली उभ्या राहणा-या या ‘काळ्या-पिवळ्या’ जीप सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड ते पावणेदोनच्या सुमारास ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आल्या. सकाळी लवकर प्रवासी मिळावेत म्हणून जीपचालक रात्रीच तेथे वाहने उभी करून जातात. गेल्या दहा-बारा वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत आहेत.
एम.एच. 17 सी 8557, एमएच. 39-705, एम.एच. 15 इ 1517, एमएच. 15 ए 1545 या क्रमांकांच्या वाहनांना आग लावण्यात आली. यात चारही जीपचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलासह भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले यांनी धाव घेत आग विझविण्याच्या सूचना दिल्या. परिसरात नाकाबंदी करून गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ते हाती लागले नाहीत. जीपमालक अरुण चौधरी, दीपक चौधरी, प्रशांत परदेशी व दीपक मोरे यांच्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
रोजगार हिरावून घेतला - द्वारका परिसरात टोळक्यांचा नेहमीच वावर असून, प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. याच गुंडांनी दहशत पसरविण्यासाठी जीप पेटवून रोजगाराचे साधनच हिरावून घेतले आहे. - अरुण चौधरी, जीपमालक
गस्तीवर प्रश्नचिन्ह - गेल्या वर्षभरात वाहन जाळपोळीच्या 40 हून अधिक घटना घडल्या असून, निवडणुकीच्या तोंडावर हे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. एकापाठोपाठ घटना घडत असूनही पोलिस गुन्हेगारांवर कठोर कारवाई करीत नसल्याने संशय व्यक्त होत आहे. अशा घटना रात्री घडत असताना पोलिसांचे गस्तपथक नेमके फिरते कुठे, असा सवाल उपस्थित झाला आहे. पोलिस ठाणे, चौक्यांपासून हाकेच्या अंतरावरच या घटना घडत असल्याने पोलिस करतात काय असा प्रश्न विचारला जात आहे.
इतर जीपचालकांची पळापळ - जीप पेटविल्यानंतर आगीचे लोळ पसरल्याचे जवळच जीपमध्ये बसलेल्या चालकांच्या लक्षात आले. त्यांनी आपापल्या जीप बाजूला काढून अग्निशमन दलास कळविले. बंब येईपर्यंत जमेल तसे आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामुळे महामार्गावरील इतर वाहनधारकांमध्येही भीती पसरून पळापळ झाली. पोलिस उपआयुक्त साहेबराव पाटील, सहायक आयुक्त गणेश शिंदे यांनी जीपचालकांची विचारपूस केली.
घटनेचे कारण अंतर्गत वाद की खंडणी वसुली? - जीपचालकांच्या अंतर्गत वादातून ही घटना घडली, की खंडणी वसुलीवरून अशी चर्चा सुरू आहे. पार्किंगच्या जागेसाठी जबरदस्तीने खंडणी वसूल करण्यात येते. या खंडणीखोरांनीच दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार केल्याचे बोलले जाते. पोलिसांनी अंतर्गत वादातूनच हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवित लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
जीपचालकांना आर्थिक मदत - जीपचालकांची संघटना असलेल्या श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागुल यांनी जीपचालकांची विचारपूस केली. पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली. जीपचालकांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.