आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोक्याची घंटा: जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड; बोगस मतदानाची भीती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर: जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे महापालिका निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपआपले हक्काचे मतदान हाताशी ठेवण्याच्या इराद्याने निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांनी जिल्हा पुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना हाताशी धरून मोठय़ा प्रमाणात बोगस (कोर्‍या) शिधापत्रिका प्राप्त करून घेतल्या आहेत. या शिधापत्रिकांच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इच्छुक उमेदवार तीन ते चार महिन्यांपासूनच हक्काचे मतदान करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे शिधापत्रिकेचा पुरावादेखील ग्राह्य धरला आहे. शिधापत्रिकेसोबत ओळखपत्राचा पुरावा दाखविल्यास संबंधित मतदाराला मतदान करता येणार असल्याने तीन ते चार महिन्यांपूर्वीच कोर्‍या शिधापत्रिका पुरवठा विभागातून बाहेर पडल्या आहेत. यासंदर्भात प्रभाग क्रमांक 61 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या विक्रम रामदास कोठुळे यांनी 17 जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रारदेखील केली आहे. प्रभाग क्रमांक 61 मधील एका इच्छुक उमेदवाराने संसरी, देवळाली कॅम्प, सामनगाव या परिसरातील नागरिकांची नावे कोर्‍या शिधापत्रिकांवर टाकून प्रमाणपत्राद्वारे सहमती घेतली असल्याची त्यांची तक्रार आहे. अशा प्रमाणपत्राच्या आधारे मतदार यादीत अनेक बोगस नावे समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले असून या मतदारांची यादीच आयुक्तांना सुपूर्द केली आहे. प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्यामुळे महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.