आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याचा त्याचा स्वार्थ, हाच खड्डय़ांचा ‘अर्थ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पाऊस आला म्हणजे रस्त्यांना खड्डे पडतात आणि खड्डे पडले म्हणजे कंबरडे मोडते हा अनुभव नाशिककरांना नवा नाही. पण याच नाशिकमध्ये असेही काही रस्ते आहेत ज्यांना आजवर खड्डेच पडलेले नाहीत. अर्थात या रस्त्यांवरुन राजकीय मंडळींचा वावर असल्यामुळे ते सुस्थितीत आहेत. कितीही जोरदार पाऊस झाला तरीही ह्या रस्त्यांवर खड्डे पडत नाहीत; मग अन्य रस्ते त्याला अपवाद का ठरतात, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर या खड्डय़ांमध्येही ‘अर्थ’ दडला असल्याचे पुढे येते. शहरातील चकाचक असलेले रस्ते, आणि सर्वसामान्यांच्या रस्त्यावरील खड्डय़ांमागचे अर्थकारण याचा घेतलेला हा धांडोळा.

तंत्रज्ञानाने गरुड भरारी घेतली असतानाही खड्डे मात्र अजूनही रस्त्यांवरच आहेत. हे खड्डे पडूच नये असे तंत्रज्ञान अद्याप विकसित झालेले नाही, असा दावा महापालिका प्रशासन करत असते. त्यासाठी मुंबई, दिल्लीसारख्या शहरांकडे अंगुलीनिर्देश केला जातो. कधी महामार्गांचाही दाखला देत आपल्या चुकांवर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला जातो. परंतू, शहरात आजही असे रस्ते आहेत की जे पावसाळ्यातही चकाचक असतात. त्यात प्रामुख्याने गेल्या सिंहस्थात झालेल्या आयआरडीपीच्या रस्त्यांचा समावेश होतो.

‘वाटाघाटी’च लावते रस्त्याची वाट रस्त्यांच्या वा डांबरीकरणाच्या कामात होणारी वाटाघाटी हीच रस्त्यांची वाट लावत असते. एखाद्या ठेकेदाराने दर्जा सांभाळत प्रामाणिकपणे काम करायचे ठरविल्यास महापालिकेतील व्यवस्था त्याला तसे करु देत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. अनेक नगरसेवक रस्त्यांच्या डांबरीकरणाचा वारंवार आग्रह धरतात. डांबरीकरणाच्या एकूण रक्कमेतून दोन टक्के रक्कम ही संबंधित नगरसेवकाला देण्याची प्रथा रुढ आहे. अर्थात त्याला काही नगरसेवक अपवादही आहेत. याशिवाय प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारीही आपापला ‘हिस्सा’ काढून घेत असतात. अशा प्रकारे रस्त्याच्या कामाच्या मंजुर रक्कमेपैकी सुमारे 30 ते 40 टक्के रक्कम ‘वाटाघाटीत’च जाते. ठेकेदारालाही रस्त्यातून नफा हवा असतो. त्यामुळे मंजूर निधीपैकी निम्याहून अधिक रक्कम ही रस्त्यावर खर्चच होत नाही. शिल्लक रक्कम अतिशय तुटपुंजी राहत असल्यामुळे त्यातून रस्त्याचा दर्जा कसा टिकवला जाणार, असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांकडून उपस्थित होतो.

निकषांचे पालनच होत नाही

रस्ते बांधण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. खडीची जाडी, डांबराचे प्रमाण किती आहे, हे बघितले जाते. त्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत डांबराचे नमुने तपासले जातात. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा दर्जाची तपासणी करणे गरजेचे असते. कॉक्रिटीकरणासाठी कोणत्या दर्जाचे सिमेंट वापरले जाते हे पाहण्यासाठी सिमेंटचा बॉक्स असलेला क्यूब भरुन तो 24 ते 48 तासांपर्यंत पाण्यात ठेवला जातो. त्यानंतर क्यूब फोडून त्याचा टिकावूपणा तपासला जातो. प्रत्यक्षात रस्त्याचे काम करताना या निकषांचे फारसे पालन होताना दिसत नाही.

रस्ते मोजताहेत अखेरचा श्वास

एकीकडे ह्यात असलेल्या माजी महापौरांच्या निवासस्थासमोरील रस्ते चकाचक असताना दिवंगत माजी महापौरांच्या निवासस्थानासमोरील रस्ते अखेरचा श्वास घेत आहेत. शहराचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांना मान मिळाला ते दिवंगत शांताराम बापू वावरे हे भद्रकाली परिसरात राहात होते. त्यानंतर महापौरपदाची माळ गळ्यात पडली त्या पंडितराव खैरे यांचे निवास्थान हे गंगाघाट परिसरात. हे नेते नसल्याने त्यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

आयआरडीपीच्या रस्त्यांमध्ये काय?

एकेकाळी नागपूरमध्ये यशस्वी झालेला एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प अर्थात आयआरडीपी नाशिकमध्येही राबविण्यात आला. याचे वैशिष्ट्य म्हणजे, पावसाळी गटार, भुयारी गटार व अन्य वाहिन्या रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात येतात. त्यामुळे रस्ता फोडण्याची गरज भासत नाही. तसेच या तंत्रज्ञानात उच्च प्रतिचे डांबर आणि अन्य सामुग्री वापरली जाते. या तंत्रज्ञानाचे रस्ते यापूर्वी 2003-04 मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी या रस्त्यांवर 80 कोटी रुपये खर्च झाला होता.

सर्व रस्त्यांचे रिसर्फेसिंग करणे दिवास्वप्न

शहरातील सुमारे 2 हजार 300 रस्त्यांना रिसर्फेसिंगची गरज आहे. बाजारभावाप्रमाणे त्यावर तब्बल 500 कोटींचा खर्च होऊ शकतो. म्हणूनच महापालिका प्रशासन रिसर्फेसिंगला हात लावायला तयार होत नाही.

डांबरमिश्रीत खडीचा वापर - खडडे बुजवण्यापूर्वी त्यात डांबर टाकतानाच लहान मोठे दगड टाकून पुन्हा डांबराचा थर टाकणे आवश्यक असते. मात्र शहरातील खड्यात केवळ डांबरमिश्रीत खडी टाकत प्रशासन आपली जबाबदारी टाळत आहे. खड्यात दगड विटा मिकस करुन चुनखडीचा वापर करण्याच्या तंत्रावरही शंका घेतली जाते. हे तंत्रज्ञान योग्य असले तरी प्रत्येक खड्यासाठी ते लागू होईलच,असे नाही.

त्यासाठी यावे लागतात राष्ट्रपती!
निकषांप्रमाणे रस्त्यांची कामे झाल्यास ते काही वर्षांनंतरही सुस्थितीत राहतात, याचा अनुभव नाशिककरांनी घेतला. अर्थात त्यासाठी राष्ट्रपतींच्या आगमनाचे निमित्त होते. 2007 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतीभा पाटील त्र्यंबकरोडमार्गे तारांगणाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. तेथून त्या दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यक्रमासाठी आल्या होत्या. तत्कालीन राष्ट्रपती ज्या रस्त्यावरुन मार्गक्रमण त्याची बांधणी करताना निकषांचे तंतोतंत पालन करण्यात आले होते. या रस्त्याला ऐनवेळी बाधा आल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असता. गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेने या रस्त्यांच्या चाचण्या घेतल्या तेव्हा रस्ते बांधणीचे सर्वच निकष पाळण्यात आल्याचा आश्चर्यकारक अहवाल त्यातून पुढे आला. विशेष म्हणजे संबंधित रस्त्यास आजपर्यंत खड्डे पडलेले नाही.


निधीची अनुपलब्धता
‘‘ दर पाच वर्षांनी रस्त्यांचे रिसर्फेसिंग केल्यास खड्डयांची समस्या भेडसावत नाही. महापालिकेत निधीच्या अनुपलब्धतेमुळे 10 वर्षांपासून रिसर्फेसिंगची कामे रखडली होती. व्हीआयपी रोड हे आयआरडीपीअंतर्गत बांधण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे रस्ते बांधताना दर्जाशी तडजोड केली जात नाही. परंतु अशा रस्त्यांना अधिक खर्च लागत असल्यामुळे त्यांची संख्या वाढविली जात नाही.’’ सुनील खुने, शहर अभियंता


आम्ही पथकर का भरावा?
महापालिकेचा पथकर आम्ही इमानेइतबारे भरतो. त्यामुळे आम्हाला चांगले रस्ते देणे ही महापालिकेची जबाबदारीच आहे. महापौरांच्या निवासस्थानासमोरील आणि राजकीय मंडळींचा वावर असलेल्या रस्त्यांसाठी ज्या सुविधा पुरविल्या जातात त्या आम्हाला का देण्यात येऊ नये? जर शहरातील खड्डे असलेले रस्ते सुधारायचे नसतील तर नागरिकांनीच पथकर भरु नये.’’ - गणेश शेलार, नागरिक

प्रत्येक नागरिक महापौरांसमान
शहरातील प्रत्येक नागरिक हा महापौर आहे. कारण महापौरांची निवड ही नगरसेवकांमधून होते. आपल्या उंची वाहनांची काळजी वाहत राजकीय लोक जसे आपले रस्ते चकाचक ठेवतात तसा विचार त्यांनी मतदारांचाही करावा. अन्यथा मतदार संबंधितांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. - सचिन शिलावट, नागरिक

आवाहन

करा संपर्क ‘दिव्य मराठी’ला !
रस्त्यांवरील खड्यांचा दणका सर्वच शहरवासियांना बसत आहे. या खड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतोच; शिवाय वाहनांचे नुकसान आणि शारीरिक व्याधीही जडत आहेत. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुनही आमची कोणी दखल घेत नाही अशी ओरड सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते. यासाठी ‘दिव्य मराठी’ ने पुढाकार घेतला असून शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर मोठे खड्डे आढळल्यास नागरिकांनी 8390905738 किंवा 9420409131 किंवा 9975547616 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.