आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तांनी केली कुंभमेळ्याच्या शाहीमार्गाची पाहणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, पर्वणीकाळात शाहीमार्गावरून साधू-महंताची निघणार्‍या मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने पोलिस यंत्रणेकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने गुरुवारी सकाळी पुरोहित संघाच्या पदाधिकार्‍यांसमवेत पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी शाहीमार्गाची पाहणी केली. तसेच, सिंहस्थासाठी पोलिसांच्या पायाभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे 102 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सन 2014-2015 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाविक, साधू-महंतांची सुरक्षितता, वाहतूक नियोजन, शाहीमार्गावरील अडथळे दूर करणे, गत वेळी झालेल्या चेंगराचेंगरीची दुर्घटना लक्षात घेता पोलिस यंत्रणेकडून नियोजन हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांसमवेत आयुक्त सरंगल यांनी तपोवन येथून पायी पाहणी दौरा केला. लक्ष्मीनारायण मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती चौक, नागचौक, काळाराम मंदिर, सरदार चौक मार्गे रामकुंडापर्यंत व तिथून परतीचा मार्ग असलेल्या खांदवे सभागृह, मूळ मालवीय चौक, पंचवटी कारंजा, आडगाव नाका अशी पाहणी करण्यात आली. यावेळी मार्गातील अतिक्रमण, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याची चर्चा करण्यात आली.
1970च्या कुंभमेळ्याचे स्मरण - 1970 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात शाही मिरवणूक व नियोजनासाठी अत्यल्प पोलिस कर्मचारी असल्याचे पुरोहित संघाने आयुक्तांना सांगितले. तसेच त्यावेळी शेकडोंच्या संख्येने साधू-महंत, भाविक सहभागी झाले असताना पोलिसांनी योग्य पद्धतीने नियोजन केल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. त्या पाठोपाठ गत वेळी चक्राकार आणि वळणावळणावर बॅरेकेडिंग करण्यात आल्याने झालेली दुर्घटनाही त्यांनी सांगितली. यावेळी पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील, संदीप दिवाण, सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे, संजीव ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले, सुभाष डौले, मौला सय्यद, सतीश शुक्ल यांच्यासह पदाधिकारी होते.
102 कोटी रुपयांचा प्रस्ताव - जिल्हा प्रशासनाकडे पोलिस यंत्रणेच्या पायाभूत सुविधा, साधनसामग्रीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे 102 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, त्याचे नियोजन सुरू झाले आहे. कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त