आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Kumbh Mela 2014 Grant Sanction Issue, Divyamarathi

सिंहस्थासाठी पालिकेला मिळणार 218 कोटी; दोन दिवसांत निधी होणार वर्ग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आगामी सिंहस्थ पर्वणीसाठी विकासकामे मार्गी लागण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, राज्य सरकारने नाशिक महापालिकेसाठी पहिल्या टप्प्यात 218 कोटींचे अनुदान पाठवले आहे. हे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले असून, येत्या दोन दिवसांत ते महापालिकेला प्राप्त होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दर बारा वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ अर्थात कुंभमेळा जवळ येत असताना राज्य सरकारकडून निधीची उपलब्धताच होत नसल्याने कामे खोळंबली होती. महापालिकेवर मनसेची सत्ता असल्याने निधी रखडवला जात असल्याची टीकाही सत्ताधार्‍यांकडून केली जात होती. त्यानंतर महापौरांसह अन्य पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सिंहस्थ निधी लवकरात लवकर पाठवावा, अशी मागणीही केली होती. या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने यापूर्वी 442 कोटींच्या कामांना सुरुवातही केली आहे.

उच्चाधिकार समितीने मंजूर केलेल्या 1 हजार 52 कोटी 61 लाख रुपयांच्या आराखड्यात साधुग्रामासाठी 82 कोटी, रस्त्यांसाठी 462 कोटी, नदीवरील पूल बांधणीसाठी 24 कोटी, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि पार्किंगच्या व्यवस्थेसाठी 55 कोटी, पाणीपुरवठ्यासाठी 96 कोटी, सीव्हेज ट्रीटमेंट मॅनेजमेंटसाठी 29 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. निधीअभावी ही कामे धिम्या गतीने सुरू होती. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने सिंहस्थासाठी पहिल्या टप्प्यात 218 कोटींचे अनुदान नाशिक महापालिकेसाठी पाठवले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला हा निधी प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसांत तो महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यातील अनुदानही लवकरच प्राप्त होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या निधीमुळे शहरातील विकासकामे मार्गी लागतील,अशी आशा आता नाशिककरांना आहे.

प्राधान्यक्रमाने कामे
राज्य सरकारकडून मिळालेल्या 218 कोटींच्या अनुदानाचा विनियोग कोणत्या कामांसाठी करावा याचा उल्लेख सरकारी पत्रात नसल्याने ही कामे प्राधान्यक्रमाने करण्यात येणार आहेत. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, ड्रेनेज या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.