आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्याच्या अर्थकारणामुळेच नाशिकमध्ये सत्तास्पर्धा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नाशिकमधील शिवसेना- भाजपची सत्ता मोडीत काढत तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व झुगारून जनतेने मनसेच्या इंजिनाला वेग दिला खरा परंतु बहुमताच्या अभावामुळे सत्तेचे स्टेशन त्यांना गाठता आले नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप हे पक्ष आकड्यांची जुळवाजुळव करून महापालिकेच्या सत्तेचे सोपान गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. 2015 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होत असून, या पार्श्वभूमीवरच यंदा सत्ता मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच होत आहे.
नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. 2015 मध्ये होणाºया कुंभमेळ्यासाठी आत्तापासूनच विकास कामे सुरू झाली आहेत. यात मोठे अर्थकारण दडलेले असते. कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी पुरवला जातो. या निधीच्या मलिद्यावर डोळा ठेवूनच नाशिक महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी बहुमत नसतानाही सर्वच पक्ष सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहात आहेत.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे सर्वेसर्वा छगन भुजबळ यांनी नाशिकची महापालिका ताब्यात घेण्यासाठी ऐनकेनप्रकारेन् प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये फक्त 20 जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला 19. त्यामुळे आणखी जोडतोड करूनच छगन भुजबळ 62 चा जादुई आकडा गाठून सत्ता स्थापन करू इच्छितात. त्यातच रामदास आठवले यांनी रिपाइंचा महापौर केल्यास शिवसेना भाजपचे समर्थन मिळवून देण्याचे सूतोवाच भुजबळांकडे केले आहे. भुजबळ याला तयार असले तरी काँग्रेसने मात्र ही योजना साफ धुडकावून लावली आहे. भाजप आणि शिवसेनाही कुंभमेळ्याच्या अर्थकारणात हात धुवून घेण्याचे स्वप्न पाहात आहेत त्यामुळेच नाशिकची सत्ता प्राप्त करण्यासाठी मोठे राजकारण केले जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मलिदा लाटण्याचे स्वप्न
केंद्र सरकारकडून गेल्या कुंभमेळ्यास नाशिकसाठी 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. 2015 च्या कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेच्या आरोग्य खात्याने 6 कोटी रुपयांच्या आरोग्य स्वच्छता आराखडा तयार केला होता तर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक पालिकांनी 945 कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार केले आहेत. गेल्या वेळेस दोन्ही पालिकांनी 545 कोटी रुपयांचे आराखडे तयार केले होते. यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतूनही हजारो कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.
2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून जनता कोणाला कौल देईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नाशिकवर आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भुजबळ आत्तापासूनच प्रयत्नरत आहेत. कुंभमेळ्याच्या सर्व कामांच्या निविदा आपल्याच कार्यकर्त्यांना मिळाव्यात असा प्रयत्न मागील वेळीही काही राजकारण्यांनी केले होते. त्याची पुनरावृत्ती यंदाही करण्यासाठी महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
8 मार्चनंतर होणार घडामोडी
नाशिक । मुंबई व ठाणे महापौराची निवड 8 मार्च रोजी होत आहे. तेथील सत्तेसाठी जुळणारी समीकरणे लक्षात घेऊन नाशिक महापालिका निवडणुकीकरिता रणनीती ठरवण्याची भूमिका कॉँग्रेस आघाडीने घेतल्याचे वृत्त आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना व भाजपनेही पुढाकार घेतल्यामुळे आता 62 या जादुई आकड्याचा विषयच निकाली निघाला आहे. कॉँग्रेसने युतीबरोबरच न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता कॉँग्रेस व राष्टÑवादी एकत्र आले तरी त्यांचे संख्याबळ 35 म्हणजेच मनसेच्या 40 पेक्षा 5 इतके कमी असेल. शिवसेना, रिपाइं व भाजपही एकत्र आले तर त्यांचेही संख्याबळ 36 च्या आसपास जाते. त्यामुळे या सर्वांचा प्रतिस्पर्धी मनसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर मनसे व भाजप एकत्र येतील अशी अटकळ बांधली जात असली तरी, सर्व समीकरणे मुंबई व ठाणे महापालिका निवडणुकीवर अवलंबून आहेत.