आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : अाखाड्यासाठी साध्वी आक्रमक, मुख्यमंत्र्यासमोर माइकची खेचाखेची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थात महिला साध्वींच्या अाखाड्यासाठी स्वतंत्र जागा मिळावी, तसेच त्यांना स्नानासाठी घाट राखीव ठेवावा, आदी मागण्या सातत्याने करणाऱ्या महिला परी अाखाड्याच्या साध्वी त्रिकाल भवन्ता सरस्वती यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात बाेलण्याचा प्रयत्न केला. परंतु, बाेलण्यास मज्जाव करण्यात अाल्याने त्यांचा संताप अनावर झाला. त्यातच महंत ग्यानदास महाराजांनी त्यांच्या हातातील ध्वनिक्षेपक खेचण्याचा प्रयत्न केल्याने तणावात वाढ झाली. या प्रकरणाकडे लक्ष घालण्याचे पालकमंत्र्यांना सूचित करीत मुख्यमंत्र्यांनी अखेर व्यासपीठावरून काढता पाय घेतला.

आपल्या मागण्यांना प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने साध्वी त्रिकाल यांनी यापूर्वीही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, भेट नाकारल्याने भाजप सरकारने महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला हाेता. तसेच आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला हाेता. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दाेन दिवसांत जागा देण्याचे अाश्वासन दिले. परंतु, या अाश्वासनाची पूर्तता न झाल्याने अखेर साध्वींनी कुंभमेळ्याच्या ध्वजाराेहण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर धाव घेतली अाणि ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला. परंतु, ध्वनिक्षेपक बंद असल्याने त्यांचा अावाज उपस्थित भाविकांपर्यंत पाेहाेचू शकला नाही. तरीदेखील त्या बाेलत राहिल्या. अखेर अाखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराजांनी साध्वींना शांत राहण्याचे अावाहन केले. परंतु, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने ग्यानदास महाराजांनी ध्वनिक्षेपक खेचण्याचा प्रयत्न केला. ध्वनिक्षेपकाची खेचाखेच सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.
राजनाथसिंह यांच्यासमाेर गाेंधळ
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न साध्वी त्रिकाल भवन्ता सरस्वती यांनी शासकीय विश्रामगृहावर केला. परंतु, राजनाथसिंह यांच्या अंगरक्षकाने त्यांना अडविल्याने त्या संतप्त झाल्या. त्यानंतर त्यांनी विश्रामगृहात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेही त्यांना अडविण्यात अाले. अखेर राजनाथसिंह अापल्या वाहनात बसत असताना त्यांनी साध्वींचे निवेदन स्वीकारले.