आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदाघाटांवर राबविणार ‘होल्ड अॅण्ड रिलीज’ प्रणाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ पर्वणीच्या दिवशी गाेदावरीच्या घाटांवर भाविकांची प्रमाणापेक्षा अधिक गर्दी होऊ नये, यासाठी ‘होल्ड अॅण्ड रिलीज’ प्रणाली अत्यंत सूक्ष्मपणे राबविली जाणार आहे. राजमुंद्री येथील अभ्यास दौऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला अाहे. या निर्णयामुळे राजमुंद्री येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घाटावरील गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनही सतर्क झाल्याचे दिसत अाहे.
जुलैमध्ये अांध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गाेदावरी महापुष्कर महाेत्सवाच्या पहिल्याच िदवशी पुष्कर घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची कारणे आपल्याकडे तशी घटना घडू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे एक पथक नुकतेच राजमुंद्री येथे जाऊन आले. तेथे आढळलेल्या त्रुटींची पूर्तता नाशिकच्या कुंभमेळ्यात करावी लागणार असल्याचे सिंहस्थ मेळा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्पष्ट करीत घाटांवरच अधिक सुरक्षेची व्यवस्था करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्यात घाटांवर जाण्यासाठी जेवढे प्रवेशमार्ग असतील, त्यापेक्षा दुप्पट प्रवेशमार्ग भाविकांना बाहेर येता यावे यासाठी ठेवा, असा सल्ला तेथील प्रशासनाने अभ्यास समितीला दिला आहे. त्यांच्याप्रमाणेच आपणही होल्ड अॅण्ड रिलीज (थांबवा आणि सोडा) प्रणाली वापरणार असलो तरी तिचे सूक्ष्म नियोजन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका घाटावर एकावेळी किती लोक थांबू शकतात, याचा अंदाज घेऊन त्यानुसार केवळ ७५ ते ८० टक्केच भाविकांनाच तेथे एकावेळी सोडण्यात येणार आहे. गर्दीचा अंदाज घेऊन एक ते दोन किलोमीटरपर्यंत हे होल्ड अॅण्ड रिलीज पॉइंट असू शकतात, अशी माहिती गावडे यांनी दिली.

दाेनशे माेटारसायकली तैनात करणार
दुर्घटना टाळण्यासाठी नियोजनात अाणखी काही गोष्टींचा अंतर्भाव केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. त्यात गर्दीत सापडलेल्या भाविकांनी प्रशासनाची मदत घेण्याचे ठरविल्यास आपण नेमके कोणत्या ठिकाणी आहोत, हे त्यांना सांगता यावे यासाठी तेथील वीजखांबांना क्रमांक देण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे. आपत्ती घडल्यास अथवा तातडीच्या क्षणी उपयोगात आणता याव्यात, यासाठी घाट परिसरात ७० मोटारसायकली ठेवण्याचे निश्चित केले हाेते. मात्र, माेठी गर्दी हाेण्याचा अंदाज लक्षात घेत अाता दोनशे मोटारसायकली ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले. गर्दीत जेथे कार किंवा अन्य वाहने बाहेर काढणे कठीण होईल, तेथे ही वाहने मदतीसाठी वापरली जातील.