आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातले रस्ते चकाकणार; कुंभमेळा येता दारी कामांची घाई भारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिंहस्थाचा कालावधी कमी आणि कामे अधिक असल्याने महापालिकेने आताशी कुठे या कामांसाठी लगीनघाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने सिंहस्थासाठी प्राधान्याने करावयाच्या 46 भूसंपादनाचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केले आहेत. प्रस्तावात गोदावरीकडे येणारे रस्ते आणि अंतर्गत व बाह्य रिंगरोडचा समावेश आहे. भूसंपादन झाल्यास येत्या दीड वर्षाच्या काळात नाशिकमधील रस्ते चकाचक दिसतील.

सन 2003 मध्ये झालेल्या सिंहस्थासाठीच या सर्व जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या; मात्र गेल्या 12 वर्षांपासून एकाही जागेचे भूसंपादन होऊ शकले नाही. मात्र, आता शहराची वाढती लोकसंख्या, वाढलेली वाहने आणि सिंहस्थासाठी येणार्‍या 50 लाख भाविकांची गर्दी लक्षात घेता संबंधित रस्ते रुंदीकरण, वाहनतळ आणि एसटीपी प्लांटची कामे प्राधान्याने हाती घेतली आहेत.

वाहनतळ अन् एसटीपी प्लांट : रस्ता रुंदीकरणासह सिंहस्थाच्या दृष्टीने आवश्यक वाहनतळ व मलनिस्सारण केंद्रांसाठीच्या जागांचाही या प्रस्तावात समावेश आहे. त्यात पंचवटीत सीतागुंफाच्या दक्षिणेस, सरकारवाड्यासमोर व द्वारका भागात वाहनतळ नियोजित असून, गंगापूर तसेच पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्र आणि पंपिंग स्टेशन प्रस्तावित आहे.

भूसंपादन दृष्टिक्षेपात
> एकूण भूसंपादनाचे 225 प्रस्ताव
> प्राधान्याने करावयाचे भूसंपादन 46 प्रस्ताव
> 46 भूसंपादनासाठी लागणार 500 कोटी रुपयांचा निधी
> शाही मिरवणूक मार्गास जोडणार्‍या रस्त्यांसाठी 42 कोटी 39 लाख
> रिंगरोडअंतर्गत जोडणार्‍या रस्त्यांसाठी 376 कोटी नऊ लाख रुपये
> तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने निधी उभारणार

महासभेवरच विषय यावा
प्रशासनाने सादर केलेले हे प्रस्ताव निर्णय घेण्यासाठी महासभेवर ठेवणे गरजेचे आहे. यातील बहुतांश प्रकरणांचा निवाडा झाला असताना पालिका आता मिळकतधारकांना टीडीआर देऊ पाहत आहे. यासंदर्भात पालिकेवर व्याजापोटी लाखो रुपयांचा भार पडत आहे.
-गुरुमितसिंग बग्गा, गटनेता, शहर विकास आघाडी

शहरातील या रस्त्यांचे होणार रुंदीकरण
रामकुंड-होळकर पूल (20 मी. रस्ता), तांबट घाट ते गंगावाडी, हेमलता चित्रपटगृह ते रुंग्ठा हायस्कूल, तिवंधा चौक ते नाव दरवाजा (9 मी. रस्ता), अशोकस्तंभ ते घारपुरे घाट (12 मी. रस्ता) , रुंग्ठा हायस्कूलरोड, लोणार गल्ली ते गोदाकाठ, मधली होळी ते तिवंधा चौक (9 मी. रस्ता), जिजामातारोड, धारकर ते सराफ बाजार, निमाणी स्टॅण्ड ते शिवाजी चौक (24 मी. ) आसारामबापू आर्शम ते आनंदवल्ली गावठाण व चांदशी पुलापर्यंतचा रस्ता, म्हसोबा मंदिर ते उंटवाडी पूल ते खेतवाणी लॉन्स (30 मी. रस्ता), सिटीसेंटर ते पुलापर्यंत, मनोहरनगर ते उंटवाडी पूल, इंगळे कॉटेज (30 मी. रस्ता), आगरटाकळी ते संगम पूल (30 मी. रस्ता), भिकुसा क्षत्रिय हिरावाडीरोड ते कॅनॉलरोड, (30 मी. रस्ता) आग्रारोड ते हनुमाननगर (30 मी. रस्ता), मेरीमागील पांजरापोळ रस्ता, निर्मला कॉन्व्हेंट ते मखमलाबाद (30 मी. रस्ता), रासबिहारी शाळा ते दिंडोरीरोड ( 30 मी. रसता), पेठरोड ते दिंडोरीरोड ( 24 मी.), रामवाडी बाय जंक्शन रस्ता, सपना चित्रपटगृह ते पाटीलनगर (18 मी. रस्ता), बिटको चौक ते कॅनॉलपर्यंत जेलरोड (30 मी. रस्ता), कॅनॉल ते संत जनार्दन स्वामी पूल जेलरोड (30 मी. रस्ता), मथुरा चौक ते वालदेवी (18 मी. रस्ता), या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव मिळकत विभागाने तयार केले आहेत.