आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ: 20 वाहनतळांची जागा निश्चित; 1700 एकर जागेचे तात्पुरते संपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध पातळीवर तयारी सुरू आहे. पोलिस यंत्रणेनेही एसटी, महसूल विभागाच्या अधिकार्‍यांसोबत संयुक्तपणे शहराबाहेरून येणारी वाहतूक थांबविण्यासाठी 20 वाहनतळांची जागा निश्चित केली आहे.

यासाठी सुमारे 1700 एकर जागेचे तात्पुरते संपादन करण्यात येणार असून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. कुंभमेळ्यात महापर्वणीच्या कालावधीत सुमारे 75 लाख भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी पोलिस यंत्रणेकडून आराखडा तयार करण्यात आला आहे.

या आराखड्यात शहरातून जाणारे महामार्ग, राज्य मार्ग आणि ग्रामीण भागातून येणार्‍या मार्गांवरील वाहतूक बाहेरच साधारणत: 10 ते 15 किलोमीटर अंतरावर थांबविण्याचे नियोजन आहे. बाहेरून येणार्‍या भाविकांचे व खासगी वाहने थांबवून तिथून बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. सदरचे वाहनतळांची जागा निश्चित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक अधिकारी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर तहसीलदार, नगरपालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिस, ग्रामीण पोलिस दलाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने केलेल्या दौर्‍यात 20 जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये काही जागा शासकीय, तर काही खासगी मालकीच्या असून त्यांच्याकडूनही तयारी दर्शविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाकडे मंजुरीसाठी सादर
सिंहस्थ काळात एक ते तीन महिन्यांसाठीच्या आरक्षणासाठी व अंतिम मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या ठिकाणी तात्पुरते शेड उभारले जाईल, याच जागेवर खासगी व सरकारी वाहने थांबविली जातील.
- पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त.

या ठिकाणी उभारणार वाहनतळ
० विल्होळी जैन मंदिराच्या आवारालगत व आंबेबहुला शिवारात रस्त्याच्या दुतर्फा
० चिंचोली शिवार, चेहडी (40 एकर), ओढा टोलनाका, ओढा रेल्वे स्टेशनलगत
० नाशिक-मालेगाव रस्त्यावरील मनपा हद्दीच्या स्वागत कमानीलगत टेकडीजवळची जागा
० पेठ रस्त्यावर आरोग्य विद्यापीठालगत 20 एकर जागा, वज्रेश्वरी झोपडपट्टीलगत मेरी कंपाउंडजवळ मोकळी जागा
० दिंडोरीरोडला स्वागत कमानीपासून डाव्या हाताला मखमलाबाद शिवारात 20 ते 30 एकर
० त्र्यंबकरोडवर सातपूर-अंबड लिंक रस्त्यावर एसटीच्या जागेत
० गिरणारे रस्त्यावर गंगापूरगावापुढे दुगाव फाट्यावर 25 ते 30 एकर जागा
०भगूर बसस्थानकाच्या आवारालगतची जागा