आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: कुंभमेळ्याच्या शाहीमार्गावर आव्हान तोडगा काढण्याचे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक येथे 2003 मध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरीची घटना अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे ताजी झाली आहे. यामुळे शाहीमार्ग जुना की नवा, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रमणी आयोगाने केलेल्या काही शिफारशींना तीव्र विरोध झाल्याने त्याच्या अंमलबजावणीची बाबही कळीचा मुद्दा ठरल्याने शाहीमार्गाबाबत पुढे काय होणार, याकडे नाशिककरांच्या नजरा लागल्या आहेत.

नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्यावेळी 27 ऑगस्ट 2003 रोजी शाही मिरवणुकीच्यावेळी सरदार चौकात चेंगराचेंगरी होऊन 32 भाविकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी शासनाने रमणी आयोग नेमला होता. या आयोगाचा अहवाल मागील वर्षी पालिका आणि जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. या अहवालात विविध शिफारशी करण्यात आल्या. त्यात जुना शाहीमार्ग अरुंद असल्याने त्याची 30 मीटर रुंदी वाढविण्याची मुख्य सूचना आहे. यासंदर्भात पालिकेच्या महासभेने एकमुखाने तीव्र विरोध करत शाहीमार्गाच्या विस्तारीकरणास नकार दिला. तेव्हापासून हा मुद्दा आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा असूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. मात्र, अलाहाबाद दुर्घटनेने शाहीमार्ग जुना की नवा अशी चर्चा पुन्हा एकवार सुरू झाली आहे.

सध्याचा जुना शाहीमार्ग तपोवन ते काळाराम मंदिरापर्यंत नऊ मीटर रुंद, तर तेथून पुढे सरदार चौक ते रामकुंडापर्यंत सात ते साडेसात मीटर रुंद आहे. त्याच्या विस्तारीकरणामुळे मुळचे नाशिककर असलेले 15 ते 20 हजार कुटुंबे बेघर होतील. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी लागणार्‍या 450 ते 500 कोटींचाही प्रश्न आहे. तसेच अनेक प्राचीन मंदिरांनाही धोका पोहचू शकतो. नवा शाहीमार्गावरील स्मशानभूमीमुळे त्यास साधुसंत, महंतांचा विरोध आहे. अशा या सर्व बाबींवर तोडगा काढत ‘शाही’मार्गावर ‘मार्ग’ काढण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे.

जुना शाहीमार्गच योग्य
अनादी काळापासून सिंहस्थाची परंपरा सुरू आहे. जुना शाहीमार्ग न बदलता प्रशासनाने योग्य उपाययोजना आतापासूनच कराव्यात. हा मार्ग फक्त साधू-महंतांसाठीच खुला केल्यास अनुचित घटना घडणार नाही. साधुग्रामसाठी 300 एकर जागेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही.
-स्वामी संविदानंद सरस्वती, प्रमुख, कैलास मठ

प्रशासनात उदासीनता
दोन वर्षांवर कुंभमेळा येऊन ठेपला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी तपोवनाला दिलेली भेट वगळता अद्याप कोणत्याही स्वरूपाचे नियोजन प्रशासनाकडून झालेले नाही. शाहीमार्ग आणि तत्सम बाबींविषयी साधू-संत, महंत, पुरोहित संघाला विश्वासात घेऊन नियोजन करायला हवे.
-सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा-गोदावरी पुरोहित संघ