आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक: निर्विघ्न कुंभमेळ्यासाठी आता आयआरएसची तजवीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नियोजनाच्या अभावामुळे गेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेपासून बोध घेऊन जिल्हा प्रशासन आयआरएस (इन्सिडन्ट रिस्पॉन्स सिस्टिम) प्रणालीद्वारे जलद प्रतिसाद देणार्‍या पथकांची स्थापना करणार आहे. त्यामुळे दुर्घटना घडलीच तर काही मिनिटांत बचाव कार्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी घटनास्थळी दाखल होणार आहे.

कर्मचार्‍यांच्या या विविध पथकांवर एक वरिष्ठ अधिकारी नियंत्रण ठेवणार असल्याने आगामी कुंभमेळ्यादरम्यान सर्व विभागांत समन्वय राहणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. पुणे येथे ‘यशदा’मध्ये झालेल्या प्रशिक्षणादरम्यान आयआरएस प्रणालीबाबत चर्चा झाली. कुंभमेळ्यात तिचा उपयोग केल्यास नियोजनात समन्वय निर्माण होईल हा मुद्दा मांडण्यात आला. गेल्या वेळी प्रत्येक विभागाच्या काही अंशी स्वतंत्र स्तरावर झालेल्या नियोजनाची माहितीच दुसर्‍या विभागाच्या प्रमुखांना तत्काळ समजण्यास अडचणी आल्याने त्याचे परिणामही भोगावे लागले होते. शिवाय, 12 वर्षांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन कायदाही नव्हता. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात यंत्रणा कमी पडली होती. मात्र 2005 पासून आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला असून, प्रगत तंत्रज्ञान आल्याने त्याचा पुरेपूर वापर केला जाणार आहे. अद्याप त्याची तयारी प्राथमिक स्तरावर असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

अशी असेल प्रणाली : या प्रणालीअंतर्गत विविध प्रकारच्या आपत्कालीन स्थितीसाठी स्वतंत्र पथके स्थापणार असून, प्रत्येक पथकाच्या प्रमुखपदी अधिकार्‍याची नेमणूक होईल. पथक प्रमुखांशी समन्वय ठेवण्यासाठी ‘कमांडंट’ म्हणून जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांची नेमणूक होण्याची शक्यता आहे.

सर्वच कर्मचारी प्रशिक्षणसज्ज
महापालिका- जिल्हा परिषदेसह महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरटीओ आदी विभागांच्या कर्मचार्‍यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्वयंसेवी संस्था, होमगार्ड, एसआरपी या विभागांनाही प्रशिक्षण दिले जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे तज्ज्ञ अधिकारी यासाठी मार्गदर्शन करतील. त्यात पूर, आग, गर्दी, वाहतुकीची कोंडी अशा परिस्थितीत काय प्रतिसाद द्यायचा याबाबत सखोल माहिती दिली जाईल.