येवला (जि. नाशिक) - तीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी येवल्यातून कांदा व्यापाऱ्याच्या मुलासह दोघांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत ६० तासांत या दोघांची नगरमधून सुटका केली. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली असून त्यात ३ महिलांचाही समावेश आहे. आरोपींनी वापरलेल्या तीन कारसह एक देशी पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे, १ चाकू, १३ मोबाइल हँडसेट असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात मुंब्र्यातूनही आणखी एकास अटक करण्यात आली आहे.
येवल्यातील कांदा व्यापारी फकीर मोहम्मद शेख यांचा मुलगा शाहबाज शेख व त्याचा मित्र राहुल चव्हाण हे १७ जानेवारीला दुपारी घराबाहेर गेले होते. रात्री पावणेनऊच्या सुमारास शाहबाजने मोठा भाऊ अंजुम यास दूरध्वनी केला व आपल्यासह राहुलचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर दहा मिनिटांतच राहुलने आईला फोन करून आम्हाल येण्यास उशीर होईल, असा निरोप दिला. या घटनेची माहिती कळताच शेख कुटुंबीयांनी रात्री पावणेबारा वाजता दोघे बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. अपहरणकर्त्यांनी रात्री सव्वा वाजता शाहबाजचाच दूरध्वनी वापरून अंजुमशी पुन्हा संपर्क साधत ३० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर १८ जानेवारीला सकाळी ६ वाजता अपहरणाची तक्रार पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी या मुलांच्या सुटकेसाठी तीन पथके तैनात केली. १८ जानेवारीला सकाळी अपहरणकर्त्यांना पैसे देण्यासाठी शेख कुटुंबीयांनी बोलावले. मात्र सोबत पोलिस असल्याचे कळाल्याने अपहरणकर्त्यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. पैसे घेऊन आधी मुंब्रा, नंतर बेलापूर व शेवटी कल्याणला या, असे सांगण्यात आले. या कॉलच्या नोंदवरून माग काढत पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले.
गणेश रसाळने रचला प्लॅन
येवल्यातील गणेश रसाळ या वाहनचालकाला शाहबाज व राहुल हे मौजेखातर फिरणारे असल्याचे माहिती झाले होते. श्रीरामपूरमधील आदमाने व शिर्डीतील किरण कडू या कुख्यात गुन्हेगारांशी किरणची ओळख होती. त्यांना पैशांसाठी भरीस पाडून अपहरणाचा व खंडणी मागण्याचा डाव रचण्यात आला.
मोबाइल कॉल्सचा दुवा
अपहरणकर्ते शाहबाजच्याच मोबाइलवरून संपर्क साधत होते. मात्र १९ जानेवारीपासून त्यांनी तो फोन बंद केला. पोलिसांनी मोबाइल कॉल्सच्या सर्व नोदी मागवल्या. त्यावरूनच रात्री १२.३० वाजता येवल्यातून गणेश रसाळ याला ताब्यात घेण्यात आले. श्रीरामपूर येथील सलमान शकील आदमाने यालाही बुधवारी ताब्यात घेतले. त्यानंतर नगर गाठून शाहबाज व राहुलची सुटका करण्यात आली.