आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Lok Sabha Constituncy News In Marathi, BJP, Hemant Godse, Divya Marathi

भाजपात गटबाजी, सेनेला ताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात ठिकठिकाणी सभा, रॅली, मेळावे घेतले जात असताना भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे मोजकेच पदाधिकारी सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. ही गटबाजीच सेनेच्या उमेदवाराला डोकेदुखी ठरत असून, त्याचा परिणाम पारंपरिक मतदार दुरावण्याची भीती व्यक्त होत आहे.


भाजप शहराध्यक्ष प्रमुख दोघा-तिघांनाच सोबत घेऊन इतरांना विश्वासातच घेत नसल्याचा आरोप करीत पदाधिकारी त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत करतात. त्यामुळे बहुतांश पदाधिकारी शेजारच्या दिंडोरी आणि धुळे मतदारसंघातील मालेगाव, बागलाण तालुक्यात पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार फेर्‍यांना हजेरी लावत आहेत. एकीकडे महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे, रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत संयुक्त प्रचारसभा घेतल्या जात आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर अद्यापही महायुतीच्या घटक पक्षांतील प्रमुख नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष, उपमहापौर व्यासपीठावर उपस्थित राहात असले तरी इतर सरचिटणीस, चिटणीस, मंडलप्रमुख, नगरसेवक मात्र, सभास्थळी फिरकतही नसल्याचे चित्र आहे. तर पक्षादेश आणि वैयक्तिक संबंधामुळे सेनेच्या उमेदवारासोबत त्यांच्या प्रभागात प्रचारफेर्‍या, मेळाव्यात ते आवर्जून हजेरी लावत असल्याचे दिसते. भाजपातील गटबाजी दूर करण्यासाठी पक्षातील आजी-माजी नेत्यांनी व मार्गदर्शकाची भूमिका बजाविणार्‍या घटकांनीही प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांनाही अपयश आल्याचे दिंडोरी मतदारसंघातील प्रचाररथाच्या उद्घाटनाचा नियोजित कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावा लागल्यावरून दिसून आले. यासंदर्भात, पक्षातील पदाधिकार्‍यांनीच प्रदेश अध्यक्षांकडे धाव घेतल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, भाजपचा पारंपरिक मतदार मनसेकडे वळू नये, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असतानाच या गटबाजीमुळे त्यास फटका बसण्याचीही शक्यता आहे.


ग्रामीण भागात निरीक्षकपदी नियुक्ती
पक्षाच्या रचनेनुसार प्रमुख पदाधिकार्‍यांची दिंडोरी व धुळे-मालेगाव मतदारसंघात विधानसभानिहाय निरीक्षकपदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये देवळा तालुक्यासाठी डॉ. राहुल आहेर, दिंडोरी-पेठ तालुक्यासाठी सुनील केदार, कळवणसाठी नितीन वानखेडे, येवला मतदारसंघात महेश हिरे, नांदगावसाठी गोपाळ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकार्‍यांनी दिंडोरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रचारासाठी स्थानिक पातळीवर नियोजनाची जबाबदारी पार पाडत आहेत. येत्या आठवडाभरात पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या सभांचे नियोजनही केले जात आहे. पक्षादेशानुसारच या तालुक्यांत दौरे केले जात असून, नाशिकमध्येही महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारात सक्रिय असल्याचा दावाही करीत आहेत. पक्षाच्या प्रमुख नेत्यांपर्यंत शहरातील गटबाजीविषयी वारंवार गार्‍हाणी करूनही त्यावर तोडगा निघत नसल्याने या पदाधिकार्‍यांमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर कायम आहे. याचाच फटका वसंत स्मृती या पक्ष कार्यालयात गेल्या आठवड्यात या सहाही मतदारसंघांत पाठविण्यात येणार्‍या प्रचार रथाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यास बसला. यामागे तात्रिक कारणं असल्याचे सांगितले असले तरी ग्रामीण अध्यक्ष व पदाधिकार्‍यांना यापूर्वी दुजाभावाची वागणूक दिल्यामुळे त्यांनीच या कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता.