आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Lok Sabha Constituncy News In Marathi, Political Parties Election Agenda

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचा पंचनामा....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आपण मत देणार; पण निवडून आल्यानंतर उमेदवार आपल्यासाठी काय करणार, याची उत्सुकता मतदारांना असतेच. हीच भावना कॅश करत उमेदवार जाहीरनामा प्रसिद्ध करतात. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याचा केलेला हा पंचनामा...


राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांनी ‘विकासवारी’चे पुढचे
पाऊल म्हणून ‘विकासनामा’ मतदारांसमोर ठेवला आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी जिल्हा परिषद,
महापालिकेच्या माध्यमातून केलेली कामे मांडतानाच मनसेच्या नेत्यांचाही समाचार घेतला आहे. मनसेतून नवा चेहरा असलेले डॉ. प्रदीप पवार यांनी ‘राजयोग’द्वारे मनसेच्या तीन आमदार व 41 नगरसेवकांनी कशी विकासगंगा आणली, याकडे लक्ष वेधले आहे. ‘नवनिर्माण’ मात्र ‘राजयोग’मध्ये दिसत नाही. सिंचन घोटाळ्यावरून राष्‍ट्रवादीविरोधात दंड थोपाटणा-या आम आदमीचे विजय पांढरे यांनी आम आश्वासने देत अजित पवार, भुजबळांच्या घोटाळ्यांवर पुन्हा तोफ डागली आहे.


भुजबळांच्या विकासवारीचा आता ‘विकासनामा’
नाशिक लोकसभा मतदारसंघात पाच वर्षांत केलेल्या कामांची विकासवारी ही पुस्तिका राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाली होती. अन्य पक्षांप्रमाणे भुजबळ यांनी यंदाच्या निवडणुकीत विकासवारीनंतर ‘विकासनामा’ जनतेसमोर ठेवला आहे. यात ओझर विमानतळ, नाशिकचे पासपोर्ट कार्यालय, नाशिक-त्र्यंबकेश्वर हरित रस्ता, नाशिक-मुंबई, नाशिक-सुरत, नाशिक-पुणे, नाशिक शहरालगतचे रिंगरोड, गंगापूर धरणाजवळील वॉटर स्पोर्टस अ‍ॅक्टिव्हिटी, सप्तशृंगगड, नांदगावजवळील नस्तनपूर पर्यटन सुविधा, येवला येथे भव्य मुक्तिभूमी स्मारक, किकवी धरण, कळमुस्ते वळण योजना अशा अनेक विकासकामांचा आलेखच दिला आहे. जिल्हा वार्षिक योजनेत 2004-05 मध्ये 86 कोटी नाशिकसाठी येत होते. मात्र, दहा वर्षांत आता 680 कोटींपर्यंत निधी दिला गेला आहे. जिल्ह्याचे 2006 मध्ये उत्पन्न 15 हजार कोटी होते, आता तेच 48 कोटींपर्यंत गेले आहे. दरडोई उत्पन्न 28 हजारांवरून 84 हजारांपर्यंत गेल्याचे सांगत नाशिक जिल्ह्याचा आर्थिक विकासदर कसा उंचावला, हेही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील टप्प्यात आयटी इंडस्ट्री, इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब, ग्रेटर नाशिक-मेट्रो ट्रेन, नवीन व आधुनिक रेल्वेमार्ग खासकरून पंचवटी एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस यांच्या वेळेत बदल करण्यासारख्या महत्त्वाच्या कामांनाही हात घातला जाईल, असे जाहीर केले आहे. शहर बस वाहतुकीसाठी 300 बसेस देण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. कृषी संशोधनासाठी रिसर्च लॅब्रोटरी, मेगा फूड पार्क अशा शेतीशी संबंधित कामांनाही गती देण्याचे जाहीर केले आहे. भुजबळ यांच्या जाहीरनाम्यात केवळ विकास हाच मुद्दा केंद्रस्थानी असून, आरोप-प्रत्यारोप टाळण्यात आले आहेत.


आरोपच जास्त
आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवणारे सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांच्या जाहीरनाम्यात लक्षवेधी अशा घोषणा नाहीत. नाशिकमध्ये मेट्रो रेल, नाशिक-डहाणू, सुरत रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करणे अशा चार-दोन घोषणांचा अपवाद सोडला तर भ्रष्टाचारमुक्त प्रशासन व आम आदमीचे शासन असेच धोरण आहे. पांढरे यांनी महिला व युवांसाठी स्वतंत्र जाहीरनामा करून दोन्ही प्रमुख वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, बसमध्ये 50 टक्के आरक्षण, सुरक्षेसाठी स्पेशल कमांडो फोर्स, तर युवांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी मुंबई, दिल्लीत मोफत प्रवास, मोफत इंटरनेट सुविधा, आंतरराष्ट्रीय स्पोर्टस सेंटरसारख्या सुविधांचे आश्वासन देण्यात आले. प्रामुख्याने राष्‍ट्रवादी, शिवसेना, मनसे, भाजप या प्रस्थापित पक्षांतील नेत्यांवर आरोपांची संख्या मोठी आहे.


पत्रकच बनले जाहीरनामा
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी स्वत:चा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याऐवजी राज्यस्तरावरील वचननाम्याचाच वापर केला आहे. लोकसभेची निवडणूक महाराष्‍ट्राकरिता कशी महत्त्वाची आहे, हे वचननाम्यात दिले आहे. महापुरुषांची स्मारके, शेतक-यांबाबतची भूमिका, सामाजिक न्यायासाठी केले जाणारे प्रयत्न, टोलमुक्त महाराष्‍ट्र, रस्ते व महामार्ग, रेल्वे, अन्नसुरक्षा व सार्वजनिक वितरण, हिंदुस्थानी मच्छीमारांवरील अन्याय, राजधानी मुंबईसाठीच्या योजना आदी बाबींचा समावेश या वचननाम्यात करण्यात आला आहे. अर्थात, राज्य आणि विशेषत: मुंबईवर लक्ष केंद्रित करून हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नाशिक मतदारसंघातील कोणतेही प्रश्न त्यात नमूद नाहीत. मात्र, प्रचारपत्रकात त्यांनी महापालिकेचे नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य असताना केलेल्या कामांचा समावेश केला आहे. याशिवाय, मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा खुलासाही त्यात करण्यात आला आहे. गेल्या पंचवार्षिक काळात आपल्याला मिळालेली उमेदवारी ही विजयासाठी नव्हे, तर मनसेची शक्ती आजमावण्यासाठी होती, असा दावा त्यांनी केला आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून येणे ही बाब म्हणजे तत्कालीन मनसेचे यश नव्हते, तर वैयक्तिक कामगिरीच्या जोरावरच सदस्यपद मिळविले, अशा आशयाची टिपण्णीही पत्रकात करण्यात आलेली आहे.


मनसेच्या को-या पाटीवर रेघा
मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी ‘राजयोग’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. डॉ. पवार यांची राजकीय पटलावरील पाटी कोरीच असल्याने त्यांनी ‘राजयोग’मध्ये मनसेच्या तिन्ही आमदारांनी केलेली कामगिरी सचित्र प्रसिद्ध केली आहेत. जाहीरनाम्यात जकातीचे खासगीकरण रद्द करणे, विकास आराखडा रद्द करणे, खतप्रकल्पाचे खासगीकरण, क्रीडा धोरण, घरपट्टीतील फेटाळलेली वाढ, थेट पाइपलाइन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, गोदावरी व
नासर्डी नद्यांची प्रदूषणमुक्ती, बालिका जन्मोत्सव योजना, घरकुल योजना, कुष्ठरोग पीडितांसाठीच्या योजना या बाबींवर भर देण्यात आला आहे. रिलायन्स फाउंडेशनला गोदापार्क विकसित करण्याचे काम देण्यात आले, त्याचाही उल्लेख आहे. याशिवाय, डॉ. पवार यांनी त्यांच्या परिचय पत्रात नातेसंबंधावरही जोर दिला आहे. ग्रामीण भागात पाणी शुद्धीकरण यंत्र, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, चष्मे वाटप या सामाजिक कामांचा उल्लेखही सचित्र करण्यात आला आहे. त्यांचा टोलविरोधी आंदोलनातील सहभाग, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागाचे उपक्रम, मनसेच्या लोकनिर्माण प्रकल्पाचे उपक्रम, विद्यार्थी सेनेची कामगिरी या बाबीही ‘राजयोग’मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कुठलेही आश्वासन मात्र त्यात देण्यात आलेले नाही.